Pune: लोहगावात कचराच कचरा; लोहगाव विकास आघाडी पुन्हा आक्रमक

विश्रांतवाडी – लोहगावमधील कचऱ्याबाबत लोहगाव विकास आघाडीने आवाज उठवल्यानंतर विभागीय आरोग्य निरिक्षक, मुकादम यांची बदली झाली. मात्र तरी देखील लोहगावमधील कचऱ्याचे ढीग काही कमी होताना दिसत नाहीत.
कचरा समस्येने लोहगावकराना ग्रासले असून जिकडे- तिकडे कचराच कचरा, असे चित्र लोहगावमध्ये निर्माण झाले आहे. वरिष्ठांनी लक्ष घालून कचरा समस्या मार्गी लावावी, अशी मागणी लोहगाव विकास आघाडीचे प्रशांत जगताप यांनी घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांच्याकडे केली आहे.
लोहगावमध्ये स्वच्छ संस्था मार्फत घरोघरी जाऊन तसेच पालिकेच्या घंटागाडी द्वारेही कचरा गोळा केला जातो. मात्र लोहगावचा वाढलेला विस्तार पाहता सर्व ठिकाणी जाऊन कचरा जमा करणे शक्य होत नाही. कचरा गाडी वेळेवर येत नसल्याने तसेच कचरा नेणाऱ्यास पैसै द्यावे लागतात म्हणून नागरीक उघड्यावर कचरा टाकतात, अशा सुमारे ४५ ठिकाणी कचरा टाकला जातो आहे. याशिवाय हॉटेल, भाजी विक्रेते, चिकन, मास विक्रेते अशा सर्वांचा कचरा रस्त्याकडेलाच पडत आहे.
लोहगाव हद्दी बाहेरील कचरा आणून लोहगाव मध्ये खाली केला जात असल्याचा प्रकार लोहगाव विकास आघाडीने उघडकीस आणला होता. त्यानतंर याला जबाबदार धरत विभागीय आरोग्य निरिक्षक हणमंत साळवे, मुकादम सुरेश उबाळे यांची लोहगाव मधुन बदली करण्यात आली. मात्र त्यानतंर सर्व यंत्रणा विस्कळीत झाली आहे.
आरोग्य निरिक्षक व नव्याने आलेले मुकादम यांच्यात समन्वय नाही. यातून पुन्हा बाहेरील कचरा गाड्या लोहगावमध्ये खाली होत असल्याने कायम स्वरुपी उपाय योजना करावी, अशी मागणी लोहगाव विकास आघाडीने केली आहे.
“मी या भागासाठी नवीन आहे. लोहगाव भाग मोठा असल्याने सर्वांची माहिती घेऊन यंत्रणा कार्यान्वित करणार आहे. हळूहळू कचरा पडणारी सर्व ठिकाणे स्वच्छ करून पुन्हा कचरा पडणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल.” – धनश्री जगदाळे, विभागीय आरोग्य निरीक्षक



