Kasba Ganpati: १३४ वर्षांच्या परंपरेत पहिल्यांदाच विसर्जन मिरवणुकीला उशीर ; कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी
Kasba Ganpati: पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री कसबा गणपती मंडळाने यंदाचा १३४ वा गणेशोत्सव पारंपरिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा केला.

Kasba Ganpati: पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री कसबा गणपती मंडळाने यंदाचा १३४ वा गणेशोत्सव पारंपरिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा केला. मात्र, अनंत चतुर्दशीच्या दिवशी निघालेल्या विसर्जन मिरवणुकीच्या सुरुवातीलाच मंडळाला अनपेक्षित अडचणीचा सामना करावा लागला.
उत्सव मंडप ते मंडईतील टिळक पुतळा या मार्गावर आधीच इतर मंडळांचे रथ उभे असल्याने रस्ता अडवला गेला. त्यामुळे श्रींची पालखी टिळक पुतळा परिसरात पोहोचण्यासाठी तब्बल ३० मिनिटांचा अतिरिक्त वेळ लागला.
कसबा गणपती मंडळाच्या १३४ वर्षांच्या इतिहासात विसर्जन मिरवणुकीच्या प्रारंभी एवढा विलंब होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. ‘शिस्त आणि नियमबद्धता’ ही मंडळाची शतकोत्तर परंपरा असून, यंदाच्या मिरवणुकीत झालेल्या या विलंबाची मंडळाने गांभीर्याने दखल घेतली आहे.
मुख्य विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतरही मार्गावर ढोल पथकांचे अनेक कार्यकर्ते आपापले ढोल घेऊन अधूनमधून पुढे जात असल्याने मिरवणुकीच्या गतीवर परिणाम झाला. परिणामी मिरवणूक आणखी काही काळ रेंगाळली.
या संपूर्ण प्रकाराबद्दल भाविक आणि नागरिकांना झालेल्या गैरसोयीबद्दल श्री कसबा गणपती मंडळाच्या वतीने तीव्र खेद व्यक्त करण्यात आला आहे. पुढील वर्षी अशा अडचणी निर्माण होऊ नयेत आणि विसर्जन मिरवणूक पूर्वीप्रमाणे शिस्तबद्ध व वेळेत पार पडावी, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती मंडळाच्या प्रमुखांनी दिली.






