Pune Ganpati : मंगलमयी गणेशाचे आज आगमन; ‘या’ वेळेत होणार मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठापना

पुणे – पुण्याचा गणेशोत्सव हा जागतिक पटलावर प्रसिद्ध असलेला गणेशोत्सव आहे. हा चैतन्योत्सव शनिवारपासून (दि. ७) सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सज्ज झाली आहेत. याशिवाय घरोघरी बाप्पांच्या आगमनाची तयारीही पूर्ण झाली आहे. पुण्यातील मानाच्या आणि महत्त्वाच्या गणपतींची ख्याती जगभर आहे, त्यामुळे हा सोहळा पाहण्यासाठी केवळ राज्यातून नव्हे तर राज्याच्या बाहेरून अगदी परदेशातूनही अनेक भाविक, पर्यटक पुण्यात येतात. परंपरेनुसार यंदाही मानाच्या पहिल्या पाच गणेश मंडळांनी आणि अन्य तीन प्रसिद्ध मंडळांनी श्रीगणेशाच्या प्रतिष्ठापनेची तयारी पूर्ण केली आहे.
मानाचा पहिला : श्री कसबा गणपती
अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र सिद्धटेक देवस्थानच्या प्रतिकात्मक मंदिरात श्रीकसबा गणपती विराजमान होणार आहेत. यावर्षी श्रींची आगमन मिरवणूक शनिवारी सकाळी ०८:१५ मिनिटांनी उत्सव मंडपातून गाजत वाजत सुरू होईल.
श्रींची प्राणप्रतिष्ठापना कण्हेरी मठ, कोल्हापूरचे मठाधिश श्री काड सिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी श्री कसबा गणपती उत्सव मंडपात होणार आहे. या मिरवणुकीत प्रभात बॅंड, ढोल ताशा पथक सहभागी होणार आहेत, अशी माहिती मंडळाचे विश्वस्त श्रीकांत शेटे यांनी दिली.
मानाचा दुसरा : ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी
ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मंडळाचा गणपती हा मानाचा दुसरा आहे. यंदाचे मंडळाचे १३२ वे वर्ष आहे. ‘श्रीं’चा आगमन सोहोळा पूर्वीप्रमाणेच पारंपरिक पद्धतीत होणार आहे. आगमनाची मिरवणूक सकाळी ठीक १०.०० वाजता नारायण पेठेतील केळकर रस्त्यावरील मंदार लॉज येथून निघेल चांदीच्या पालखीत विराजमान श्री जोगेश्वरी गजाननाची मिरवणूक कुंटे चौक, नगरकर तालीम चौक, अप्पा बळवंत चौक मार्गे ती उत्सव मंडपात पोहोचेल.
मिरवणुकीत आढाव बंधूंचे नगारावादन, न्यू गंधर्व ब्रास बॅंन्ड, शिवमुद्रा ढोलताशा पथक, ताल पथक, विष्णूनाद शंख पथक सहभागी होणार आहेत.
दुपारी १२.११ वाजता सनई-चौघड्याच्या मंगलमय वातावरणात श्रींची प्राणप्रतिष्ठापना आचार्य प. पु.स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज (कोशाध्यक्ष – श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, आयोध्या) यांच्या हस्ते होणार आहे. यंदाच्या वर्षी स्वानंद निवास या काल्पनिक गणेश प्रासादामध्ये चांदीच्या देव्हाऱ्या मधे श्री जोगेश्वरी गजानन विराजमान होणार आहेत.
मानाचा तिसरा : गुरूजी तालीम
पुण्याचा राजा मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाचे हे १३८ वे उत्सव वर्ष आहे. ‘श्रीं’ची आगमन मिरवणूक शनिवारी सकाळी १०.३० वाजता निघणार आहे. गुरूजी तालीम गणपती मंदिरापासून ही मिरवणूक निघेल. त्यानंतर गणपती चौक, लिंबराज महाराज चौक, अप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी चौक, गणपती चौक, गुरुजी तालीम मंडळ उत्सव मंडप येथे तिची समाप्ती होणार आहे. मिरवणुकीत जयंत नगरकर यांचे नगारावादन, अश्वराज ब्रास बँड, गुरुजी प्रतिष्ठान ढोल ताशा पथक, रुद्रांग ढोल ताशा पथक, आवर्तन ढोल ताशा पथक सहभागी होणार आहे.
स्वप्नील सरपाले आणि सुभाष सरपाले यांनी बनवलेल्या फुलांच्या गज रथातून श्रींचे आगमन मिरवणूक होणार आहे. श्रींची प्राण प्रतिष्ठापना दुपारी ०१ वाजून ३१ मिनिटांनी उद्योजक पुनीत बालन आणि जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते होणार आहे. यंदाचे वर्षी साताराचे सजावटकार सुशील निगडे आणि विकास पवार यांचे मार्गदर्शनाखाली संपूर्ण फायबर ग्लासमध्ये बनवलेल्या आकर्षक ‘गज महल’ बाप्पा विराजमान होणार आहेत.
मानाचा चौथा : गणपती श्री तुळशीबाग
पेशवेकालीन श्रीराम मंदिरापासून प्रभू श्रीरामचंद्राच्या पालखीतून तुळशीबाग मंडळाच्या श्रींच्या पूजेच्या मूर्तीची मिरवणूक सकाळी १० वाजता निघणार आहे. मिरवणुकीत अग्रभागी लोणकर बंधूचा नगारा, शिवगर्जना आणि विघ्नहर्ता ढोल ताशा पथक सहभागी होणार आहे. मिरवणूक गणपती चौक लक्ष्मी रस्त्याने नगरकर तालीम चौकातून उजवीकडे अप्पा बळवंत चौक, बुधवार चौक, बेलबाग चौक, लक्ष्मी रस्त्याने गणपती चौकातून तुळशीबागेत उत्सव मंडपात येईल.
दुपारी साडे बारा वाजता उत्सव मंडपात श्रींची प्रतिष्ठापना होईल. कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल हे सपत्नीक प्रतिष्ठापना करतील. मंडळाचे अध्यक्ष विकास पवार उपाध्यक्ष विनायक कदम कोषाध्यक्ष नितीन पंडित तसेच तुळशीबागेतील व्यापारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच यंदाच्या वर्षी मंडळाने ओरिसातील पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिरातील गर्भगृह आणि भव्य प्रवेश द्वाराची सजावट केली असून त्याचे उद्घाटन सायंकाळी उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते होईल.
पानाचा पाचवा : केसरीवाडा
मानाचा पाचवा केसरीवाडा गणेशोत्सवाची प्रतिष्ठापनेची मिरवणूक सकाळी ०९.३० वाजता रमणबाग चौकातून निघणार आहे. प्रथेनुसार पालखीतून मिरवणूक काढली जाणार आहे. मिरवणुकीत गंधाक्ष आणि श्रीराम ढोल ताशा पथक असणार आहेत. यावेळी बिडवे बंधू यांचे नगारावादन होणार आहे. प्रतिष्ठापना रोनक रोहित टिळक यांच्या हस्ते ११:०० वाजता होईल. केसरी ट्रस्टचे विश्वस्त डाॅ. दीपक टिळक, डाॅ. गीताली टिळक, रोहित टिळक, डाॅ. प्रणती टिळक उपस्थित राहतील.
अखिल मंडई मंडळाचा शारदा गजानन
फुलांनी सजलेल्या भव्य त्रिशूळ रथातून अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची आगमन मिरवणूक निघणार आहे. शनिवार (दि. ७) सकाळी १०:०० वाजता आगमन मिरवणुकीची सुरुवात होईल. गणेशाची प्रतिष्ठापना दुपारी १२:०० वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरु डॉ. पराग काळकर हे सपत्नीक करणार आहेत. अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदा १३१ वे वर्ष आहे. ही मिरवणूक अखिल मंडई मंडळ, मंडई पोलीस चौकी, बाबू गेनू चौक, रामेश्वर चौक येथून पुन्हा बाबू गेनू चौक मार्गे उत्सव मंडप अशी निघणार आहे. मिरवणुकीत न्यू गंधर्व बॅन्ड पथक, स्वराज्य, सामर्थ्य हे ढोल पथक सहभागी होणार आहेत. त्यानंतर पाषाणात कोरलेल्या पुरातन शिवालयात अखिल मंडई मंडळाचे शारदा गजानन विराजमान होणार आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी कर्नाटक हुमनाबाद येथील श्री दत्त सांप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिकप्रभू यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ०८.३० वाजता मुख्य मंदिरापासून सिंह रथातून श्रींची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. आकर्षक फुलांचा रथ साकारण्यात आला असून, दोन सिंहाच्या प्रतिकृती रथावर लावण्यात येणार आहेत. प्रतिष्ठापनेनंतर उत्सवमंडपात दुपारी १२:०० पासून भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पाची प्रतिष्ठापना गायक पद्मश्री कैलाश खेर यांच्या हस्ते शनिवारी (दि. ७) दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. त्यापूर्वी ढोल-ताशांच्या गजरात आणि जंगी मिरवणूक देखील निघणार आहे.
मंडळाचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी ही माहिती दिली. गणेश चतुर्थीला सकाळी ०८ वाजून १० मिनिटांनी बाप्पाची आरती होईल. त्यानंतर मिरवणुकीला सुरूवात होईल. लाठीकाठी मर्दानी खेळ आणि शंखनाद होईल. त्यांनतर सात पथकांकडून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनासमोर ढोल-ताशांची सलामी दिली जाणार आहे. शिवमुद्रा, वाद्यवृंद, मानवंदना, श्री नुमवी, कलावंत, श्रीराम ही सात ढोल ताशा पथके बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी असणार आहेत. १३२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच यावर्षी बाप्पाच्या रथाला बैलजोडी न लावता कार्यकर्ते हा रथ ओढणार आहेत.





