पुणे गणेशोत्सव 2021: मंडळे श्रीच्या दर्शनाची ऑनलाईन व्यवस्था करणार

पुणे – शहराच्या मध्यवर्ती भागातील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पोलीस उपायुक्त परिमंडळ एकच्या कार्यालयात नुकतीच पार पडली. या बैठकीत गणेश मंडळांनी दर्शनाची व्यवस्था ऑनलाईन, फेसबुक व इन्स्टा ग्रामवर करणार असल्याचे सांगितले.
विश्रामबाग पोलीस ठाणे येथे पोलीस उपायुक्त (परिमंडळ 1) डॉ.प्रियंका नारनवरे यांचे अध्यक्षतेखाली आगामी गणेशोत्सव-2021 चे अनुषंगाने हददीतील मानाचे व महत्वाचे गणपती मंडळांच्या पदाधिका-यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. बैठकीत सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच मंडळांच्यावतीने प्रसाद कुलकर्णी (तांबडी जोगेश्वरी), प्रविण परदेशी( गुरुजी तालीम मंडळ) नितीन पंडीत, (तुळशीबाग गणपती मंडळ), अनिल सकपाळ (केसरीवाडा गणपती) , महेश सुर्यवंशी ( श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्ट), आण्णा थोरात (अखिल मंडई मंडळ) , दिपक मारणे (बाबु गेणु गणपती मंडळ ) सजिव मारणे ,(श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ), समिर शेलार (जिलब्या मारुती मंडळ ), राहुल अलमखाने (होनाजी तरुण मंडळ ), प्रमोद कोंढरे ( नातुबाग तरुण मंडळ )असे अंदाजे 20 ते 25 मंडळांचे पदाधिकारी उपस्थीत होते.
बैठकीच्यावेळी मंडळाचे पदाधिका-यांनी गणेश मुर्ती, मंदिर आणि लहान मंडपात स्थापन करणार असुन, दर्शनाची व्यवस्था ऑनलाईन व फेसबुक, इन्स्टा ग्रामवर करणार असल्याचे सांगितले. तसेच यावर्षी आम्ही वर्गणी मागणार नसुन, आम्हाला रस्त्याच्या दोन्ही बाजुस छोटा रनिंग मांडव व कमान टाकण्यास जहीरातीस परवानगी दयावी. मांडवामध्ये गेल्यावर्षी प्रमाणे नो-पार्कीग करण्यात यावे व बिनधनी वाहने वाहतुक पोलीसांमार्फत काढुन घेतली जावीत. ज्या मंडळाची गणेश मंदिरे नाही त्या मंडळांना छोटा नियमात बसणारा मांडव उभारावा अशा प्रकारे मत व्यक्त केले. तर पोलीस उपायुक्त डॉ.प्रियंका नारनवरे यांनी गणपती मंडळाचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगतले की, आम्ही मंडळाना प्रत्यक्ष भेटी देवून पाहणी करणार आहोत.
सध्या कोरोना विषाणु संसर्गचा प्रसार वाढत असुन दिवसेंदिवस पुणे शहरत कोरोना बाधितांचे संख्येत वाढ होत आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकार व पुणे महानगरपालिकेने सांगीतलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करु. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपले मंडळाचे श्री गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना ज्या मंडळांची मंदिरे आहेत त्यांनी मंदिरातच स्थापन करावी व ज्या मंडळाचे मंदिर नाही त्यांनी महापालिकेने दिलेले नियम व अटींचे पालन करुन छोटे मंडप टाकावेत. उत्सव अगदी साध्या पध्दतीने साजरा करावा. कोरोना विषाणु अनुषंगाने ऑनलाईन व फेसबुक, इन्स्टा ग्रामवर जनजागृती करावी. ध्वनिक्षेपक मर्यादीत लावावे असे आवाहन केले आहे.





