Petrol Price Hike : पुणेकरांना मोठा झटका! पेट्रोलच्या दरात इतक्या रुपयांनी वाढ; इराण-इस्रायल संघर्षाचा फटका
Petrol Price Hike : मध्यपूर्वेतील संघर्षामुळे पुणे शहरात प्रीमियम पेट्रोलचे दर ११३.७७ रुपयांवर पोहोचले आहेत.

Petrol Price Hike : पुणे शहरात इंधन दरवाढीचा फटका बसला असून प्रीमियम पेट्रोलच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून त्याचा परिणाम थेट पुणेकरांच्या खिशावर झाला आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी ‘स्पीड’ आणि ‘पॉवर’ या प्रीमियम पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2.09 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे पूर्वी 111.68 रुपये प्रति लिटर असलेला दर आता 113.77 रुपये प्रति लिटर झाला आहे.
नवे दर असे
जुना दर: 111.68 रुपये प्रति लिटर
वाढ: 2.09 रुपये प्रति लिटर
नवा दर: 113.77 रुपये प्रति लिटर
दरवाढीमागे जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ हे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. मध्यपूर्वेतील तणावामुळे तेल उत्पादन आणि पुरवठा साखळीवर परिणाम झाला असून ऊर्जा प्रकल्पांवर हल्ल्यांमुळे बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे.
तज्ज्ञांच्या मते, होर्मुझ सामुद्रधुनी येथे अडथळे निर्माण झाल्यास जागतिक तेलपुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. जगातील सुमारे २० टक्के तेल वाहतूक या मार्गाने होत असल्याने भविष्यात इंधन दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे आगामी काळात सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





