पुणे : कर्वे रस्त्याच्या गर्दीवर चार कलमी आराखडा

पुणे –नळ स्टॉप उड्डाणपुलाचा उतार असलेल्या कर्वे रस्त्यावरील गर्दीच्या ठिकाणांचे अभ्यास-सर्वेक्षण केल्यानंतर पुणे महानगरपालिकेने या रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी चार कलमी आराखडा तयार केला आहे. कर्वे रोड तसेच लॉ कॉलेज रस्त्यावरवरील उताराजवळील अरुंद रस्त्यामुळे दररोज संध्याकाळी 6 ते रात्री 8 यावेळेत मोठी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे नवीन आराखड्यानुसार पीएमपीएमएलच्या बसेस नळ स्टॉप ते पौड फाटा दरम्यान कर्वे रस्त्यावरून जाण्याऐवजी उड्डाणपुलावरून धावणार आहेत, असे पोलीस उपायुक्त (वाहतूक) राहुल श्रीरामे यांनी सांगितले.
यासंदर्भात अधिक माहिती देताना राहुल श्रीरामे म्हणाले की, पौड फाटा येथे असलेल्या पीएमपीएमएल बस स्टॉपचे स्थलांतर करण्याचा प्रयत्न करीत आहोत, जेणेकरून बसेस उतारावरून खाली उतरल्यानंतर लगेच थांबणार नाहीत. हा स्पॉट वाहूतक कोंडीस कारणीभूत ठरत आहे. दुसरा मुद्दा म्हणजे, चांदणी चौकाकडे जाणाऱ्या एमएसआरटीसीच्या बसेस म्हात्रे पुलाऐवजी लकडी पूल (खंडोजीबाबा चौक) येथून सोडल्या जातील आणि या बसेस उड्डाणपुलावरून चालवाव्या लागतील. सदर निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि पीएमपीएमएल प्रशासनास कळविले आहेत.
त्यानुसार पीएमपीएमएल अधिकाऱ्यांनी रसशाळा चौकात ट्रॅफिक वॉर्डन तैनात करण्याचा निर्णय घेतला असून हे वॉर्डन बस चालकांना उड्डाणपुलाचा वापर करण्यास सांगतील. तिसरा मुद्दा म्हणजे, वाहनचालकांना कर्वे रस्त्यावरून जायचे ते पौड रस्ता किंवा कोथरूडला पोहोचत. परंतु, प्रभात रस्ता किंवा भांडारकर रस्त्याने कर्वे रस्त्यावरून खाली उतरल्यानंतर चौकांतून उजवे वळण घेता येत नव्हते. त्यासाठी लॉ कॉलेज रस्त्यावरील आठवले चौकात जावे लागे तेथे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे वाहनचालकांना डॉ. केतकर रस्त्यापासून (कलमाडी बंगला रस्ता) कर्वे रस्त्यावरून उजवे वळण घेण्याच्या सूचना करणार आहोत. हे वाहनधारक आता नवीन उड्डाणपुलाचा वापर करू शकतील. त्यानुसार सिग्नल आणि सिग्नलच्या वेळेत बदल केला जाणार आहे. शेवटी एस.एम. जोशी पुलावरून (गरवारे कॉलेजजवळ) कोथरूड/पौड फाट्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी रसशाळा चौकातील डावे वळण सुरू केले जाणार आहे. त्यामुळे रसशाळा चौकातील गर्दी कमी होणार आहे. ही वाहने थेट उड्डाणपुलाचा वापर करू शकतात. यानुसार चार कलमी आराखडा राबविल्यानंतर, दोन दिवस रहदारीच्या स्थितीवर लक्ष ठेवून परिस्थिती सुधारली नाही तर पुन्हा रस्त्याचा अभ्यास करू. जर, या आराखड्यानुसार वाहतूक सुरळीत राहिली तर वाहतूक विभाग त्याची अंमलबजावणी करेल, असे राहुल श्रीरामे यांनी सांगितले.





