PUNE: हडपसरमधील वाहतुकीसाठी आता चार लेन; ‘बीआरटी’सह अन्य अडथळे हटवणे सुरू

पुणे – मुंढवा चौकातील “बॉटलनेक’ स्थिती फोडल्यानंतर महापालिकेने आपला मोर्च सोलापूर रस्त्याकडे वळवला आहे. या रस्त्याची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी भैरोबानाला चौक ते 15 नंबर आकाशवाणी रस्त्यापर्यंत अडथळे हटवले जाणार आहेत.वाहतूक पोलीस, पीएमपी, महापालिका आणि आरटीओ यांच्यात मागील आठवड्यात बैठक झाली होती. त्यानंतर मनपाने या मार्गावर प्रत्यक्ष कारवाई सुरू केली.
यात प्रामुख्याने अनावश्यक बीआरटी मार्ग काढणे, पदपथाची रुंदी कमी करणे, सायकल ट्रॅक कमी करणे तसेच तीन चौकांमध्ये अडथळा ठरणारे बीआरटीचे बस थांबे रस्ताकडेला बसविणे अशा कामांचा समावेश आहे. त्यामुळे, ही कामे पूर्ण झाल्यास या रस्त्यावर दोन्ही बाजूस प्रत्येकी चार लेन वाहतूकीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली. भैरोबानाला ते आकाशवाणी हा रस्ता सध्या 45 मीटरचा आहे. मात्र, 10 मीटरचा बीआरटी मार्ग, दोन्ही बाजूंस प्रत्येकी 4 मीटर पदपथ तसेच सायकल ट्रॅक, तर काही भागांत साडेसात मीटरचा सेवा रस्ता आहे.
दुभाजक आणि अतिक्रमणे यामुळे जवळपास 25 मीटर रस्ता वापरताच येत नाही. ज्या सुविधांसाठी हा रस्ता आहे, त्या सलग नसल्याने काही भागांत रिकामा रस्ता, तर काही भागांत अतिक्रमणे आहेत. त्यामुळे अनावश्यक बीआरटी काढण्यात येत आहे. याशिवाय तीन ठिकाणी रस्त्यातच बीआरटी थांबे आल्याने कोंडी झाली असून त्यामुळे वैदुवाडी, रामटेकडी तसेच फातिमानगर येथील बीआरटी थांबे काढून ते बाजूला उभारत पदपथांची रुंदीही दोन मीटरने कमी केली जाणार आहे.
“अडथळे हटवून फेरनियोजन केल्यास सोलापूर रस्त्यावर दोन्ही बाजूंस किमान 4 लेन वाहनांसाठी उपलब्ध होतील. सध्या केवळ दोन लेन असून पदपथ, सेवा रस्त्यावर अतिक्रमणे आणि पार्किंग होत आहे. त्यामुळे त्याचा वापरच होत नसल्याने ते कमी करून रस्ता रिकामा करून देण्यास आमचे प्राधान्य आहे. सर्व विभागांची संमती घेऊनच हे काम करण्यात येत आहे.” – विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, मनपा





