Pune : प्राण्यांसाठी वनक्षेत्रातच आहाराची व्यवस्था व्हावी

पुणे : वन्य प्राणी आपले अधिवास सोडून मानवी वस्तीत जाऊ नयेत, यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. ब्रिटिश कालखंडात केलेल्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. वन्य प्राणी हे भोजनासाठी मानवी वस्तीत प्रवेश करत असल्याने त्यांच्या अधिवासातच आहाराची व्यवस्था होणे गरजेचे आहे. यामुळे वन्य प्राण्यांचे मनुष्यावर हल्ले होणार नाही, असे मत वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले.
वाघ तसेच बिबट्यांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी नाईक यांनी नुकतीच एक बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
जंगलांच्या कोअर क्षेत्रात विविध प्रकारचे फळ झाडे लावल्यास शाकाहारी प्राण्यांना त्या ठिकाणी खाद्य उपलब्ध होऊन मांसाहारी प्राण्यांची देखील खाद्याची सोय होईल, असे नाईक यांनी व्यक्त केले.
तसेच जंगलामध्ये लागणारी आग नियंत्रणासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या विषयासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर कशा प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्यांचा अभ्यासही करण्याच्या सूचना मंत्री नाईक यांनी दिल्याचे सांगितले. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या मनुष्यहानीसंदर्भात आवश्यक त्या उपाययोजना करण्याबरोबरच योग्य ती नुकसान भरपाई देण्याचा शासन विचार करत आहे. तथापि, राखीव क्षेत्रामध्ये कोणत्याही व्यक्तीने जाऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे वनसफारी करतांना काही पर्यटक वन्य प्राण्यांच्या वाट रोखून त्यांना पाहत असल्याने दिसून आले. यावरही वन अधिकाऱ्यांना लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याचे वन मंत्री नाईक यांनी यावेळी सांगितले.





