PUNE : वाहतूक नियम पाळा, अन्यथा ‘चुकीला माफी नाही’

पुणे – बस चालवताना वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष केले किंवा नियम तोडले, तर संबंधित चालक आणि वाहकावर थेट निलंबनाची कारवाई होणार. त्यामुळे चुकी करणारी व्यक्ती कोणीही असो, “चुकीला माफी नाही’, असा पवित्रा आता पीएमपी प्रशासनानेही घेतला आहे. विशेषत: ठेकेदारांच्या चालक-वाहकांना सक्तीच्या सूचना दिल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पुणे परिवहन महामंडळाकडून पुणे, पिंपरी-चिंचवड, शहरालगतच्या ग्रामीण भाग आणि पीएमआरडीए कार्यक्षेत्रात सेवा दिली जाते. पण, पीएमपीने सिग्नल तोडणे, झेब्रा कॉसिंगवर उभे राहणे, पीएमपी चालक मोबाइलवर बोलत बस चालवतात, लेनची शिस्त न पाळणे, बसवरील मार्गाचे बोर्ड व्यवस्थित नसणे, बसस्टॉपवर न थांबणे, अशा अनेक तक्रारी प्रवाशांसह लोकप्रतिनिधी, पोलीस आणि सामाजिक संस्थाकडून येतात. त्यामध्ये प्रामुख्याने ठेकेदाराच्या बसवरील चालक आणि वाहकांच्या तक्रारी अधिक असल्याचे दिसून आले. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तत्काळ खासगी ठेकेदारासह चालक व वाहकांसाठी आदेश जारी केले.





