Pune: भविष्यात हेलिकाॅप्टर निर्मितीवर भर – केंद्रीय मंत्री राममोहन नायडू

पुणे – देशात हेलिकॉप्टर वाहतुकीचे क्षेत्र खूप मोठे आहे. मात्र, हेलिकाॅप्टरची संख्या तुलनेने कमी असल्यामुळे भविष्यात हेलिकाॅप्टर निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गंत एक स्वतंत्र संचालक नेमण्यात आले आहेत. त्यामुळे हेलिकॉप्टर, छोटे एअरक्राफ्ट क्षेत्राचा विकास होण्यास मदत होणार होईल. त्यासाठी केंद्र सरकारकडून शक्य ती मदत केली जाईल, अशी माहिती केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी दिली.
मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन, राज्य सरकार, पवर हंस आणि फिक्की यांच्या संयुक्त विद्यमाने सातव्या हेलिकॉप्टर अँड स्मॉल एअरक्राफ्ट परिषदेचे आयोजन पुण्यात पार पडले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव असंगबा चुबा आ, फिक्कीचे आर. के, सिंग, डीजीसीएचे संचालक फैज अहमद किडवाई, एमएडीसीच्या उपाध्यक्ष स्वाती पांडे आदी उपस्थित होते.
राममोहन नायडू म्हणाले, की भारतमाला, सागरमाला, उडान अशा विविध योजनांतून सर्वसामान्य प्रवाशांना पर्यटन करता यावे, यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. परिषदेमुळे या क्षेत्राला नवीन संशोधन, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकास साध्य करता येणार आहे. विकसित भारत २०४७ हा संकल्प भविष्यकाळात पूर्ण करण्यासाठी नागरिक हवाई वाहतूक क्षेत्र सज्ज असेल.
मोहोळ म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमध्ये गेल्या ११ वर्षांत नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. स्थानिक पातळीवर हवाई कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी विविध यशस्वी प्रयत्न केले जात आहेत. देशांतर्गत हवाई वाहतूक वाढल्यास निश्चितच नव्या आर्थिक संधी उपलब्ध होऊन व्यापार, उद्योग, पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. आज देशात २५० हून अधिक हेलिकॉप्टर्स नागरी सेवेत कार्यरत असून, जवळपास एक हजाराहून अधिक हेलिपॅड्स उपलब्ध आहेत. येणाऱ्या काळात या क्षेत्राच्या विस्तारासाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत





