Pune: शहरभर फ्लेक्सची भरमार; न्यायालयाच्या आदेशाकडे महापालिकेचा कानाडोळा

पुणे – विधानसभा निवडणुकीनंतर शहरात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड, बॅनर लावले जाणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेस दिले होते. मात्र, महापालिकेकडून या आदेशाच्या कारवाईलाच हरताळ फासला असून, शहराच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स आणि बोर्ड झळकले आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे यातील एकाही जाहिरात फलकावर महापालिकेने कारवाई केलेली नाही, तसेच ते काढून घेण्याची तसदीही महापालिका प्रशासनाने दाखविलेली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनच न्यायालयाचा आदेश धुडकावत अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांना अभय देत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड, बॅनर्स सार्वजनिक ठिकाणी लावले जात असल्याने शहराचे मोठ्या प्रमाणात विद्रूपीकरण होत आहे. याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल असून, एका याचिकेच्या सुनावणीत शहरात निवडणूक निकालानंतर अनधिकृतपणे फ्लेक्स. बोर्ड, बॅनर लावले जाणार नाहीत, अशा सूचना केलेल्या होत्या.
त्यानुसार महापालिकेनेही जाहीर निवेदन काढत अशा जाहिराती लावल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला. मात्र, आता शहरभर जाहिराती लावलेल्या असताना महापालिका प्रशासन मात्र झोपलेले असून, हे फ्लेक्स जावेगरच आहेत, तसेच कोणावरही कारवाई झालेली नाही. याबाबत महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. मात्र. संपर्क होऊ शकला नाही.





