Pune : फटाक्यांनी वाढवला प्लॅस्टिक कचऱ्याचा भार

जनजागृतीनंतरही शहरात वापर
पुणे – महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात फटाक्यांच्या प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यात आल्यानंतरही फटाक्यांमुळे हवा प्रदूषण वाढले, त्या सोबतच फटाक्यांमध्ये वापरण्यात आलेल्या साहित्यांमध्ये प्लास्टिकचा वापर करण्यात आला असून कचऱ्यात असे प्लास्टिक मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने त्याच्यावर प्रक्रीया करणे पालिकेसाठी अडचणीचे ठरत आहे.
शहरात दिवाळीच्या कालावधीत यावर्षी दैनंदिन कचऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विशेष म्हणजे दिवाळीच्या कालावधीत शहरातील ५० टक्केहून अधिक पुणेकर शहराबाहेर असतानाही कचरा वाढला आहे. त्यात, प्रामुख्यांनी फटाक्याच्या कचऱ्याचा समावेश आहे. त्यातील कागदी कचऱ्यावर प्रकीया करणे शक्य असले तरी या कचऱ्यात प्लास्टिक आढळून आले आहे.
यामध्ये प्रामुख्याने भुईचक्र तसेच मोठ्या आवाजाच्या फटाक्यांसाठी जाड मटेरीयल वापरण्यात आले आहे. या शिवाय, बंदी असलेले प्लस्टिकही पॅकिंगासाठी वापरण्यात आले असून त्याचा कचराही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे अशा फटाक्यांवरील बंदी केवळ कागदोपत्रीच असल्याचे यातून उघड होत आहे.
फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषण , वायू प्रदूषण होत आहे. मात्र, आता त्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वापरले असल्याचेही आढळून येत आहे, अशा फटाक्यांवर महापालिकेने बंदी घालणे आवश्यक आहे. तसेच, विक्रेत्यांवर कारवाई करणेही आवश्यक आहे.
– निलकंट मांढरे ( सजग नागरिक)





