Pune : अखेर मुदत संपलेल्या वाहनांचा लिलाव

पुणे : केंद्रशासनाने शासकीय संस्थाची १५ वर्षे जुनी वाहने भंगारात काढण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या ताफ्यातील तब्बल ४७३ आर्युमान संपलेली वाहने आहेत. या वाहनांची आॅनलाईन लिलाव प्रक्रीया महापालिकेने मंगळवारी राबविली होती. या लिलावात १२० वाहनांचे १ कोटी ४७ लाख रूपये महापालिकेस मिळाले आहेत. एका टप्प्यात २० वाहनांचा समावेश करुन त्यांना २४ टप्प्यात विभागण्यात येवून लिलाव करण्यात आला. काही टप्प्यांमध्ये अपेक्षीत उत्पन्न मिळत नसल्याने महापालिकेने ही प्रक्रीया रद्द केली असून, पुन्हा एकदा लिलाव केले जाणार आहेत. या सर्व वाहनांच्या लिलावातून महापालिकेस ६ कोटी ३३ लाख रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पुणे महापालिकेच्या अनेक वाहनांचे आयुष्य संपल्यानंतर ती महापालिकेच्या वाहन डेपोमध्ये धूळ खात पडली होती. ही वाहने अनेक वर्षांपासून तिथे पडून असल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांकडून तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर, पुणे महापालिकेने १७ ते २५ वर्षे जुन्या ४७३ वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महापालिकेने इतक्या मोठ्या संख्येने वाहनांचा लिलाव केला. या लिलावात केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या पाच एजन्सींनी भाग घेतला.
महापालिकेला जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी पहिल्या फेरीत किमान किंमत जाहीर करण्यात आली होती. या लिलाव प्रक्रियेत ६ टप्प्यांसाठी उच्च बोली लागल्या होत्या. या ६ टप्प्यांमध्ये १२० वाहनांची लिलाव प्रक्रिया अंतिम केली जाईल. इतर १८ टप्प्यांमधील सुमारे ३६० वाहनांचा पुन्हा लिलाव केला जाईल.
– जयंत भोसेकर (उपायुक्त, वाहन विभाग)





