पुणे : ‘फेरफार’ : प्रभाग क्र.9 येरवडा; फक्त ‘रिव्हिजन’; एक जण बसणार घरी

पुणे – (संदिप घोडके) विद्यमान नगरसेवकांच्या सोयीनुसार हा प्रभाग झालेला आहे. यामध्ये विशेष बदल झालेला नसल्याने विद्यमान नगरसेवकांसाठी प्रभागात फक्त गेल्यावर्षीची रिव्हिजन करायची आहे. शिवसेनेचे तीन व एमआयएमआयएमची एक नगरसेविका असे चार नगरसेवक आहेत. पूर्वीच्या प्रभाग क्र. 6 मधून काही भाग प्रभाग क्र. 8 तर काही भाग प्रभाग क्र.7 ला जोडलेला आहे. प्रभाग तीनचा झाल्याने विद्यमानांपैकी एकाला घरी बसावे लागणार आहे. झोपडपट्टीचा मोठा भाग प्रभागात आहे. त्यामुळे सर्वसामान्य मतदारांना महत्त्व असणार आहे. महाविकास आघाडी म्हणून लढल्यास कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार बंडखोरी करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांना बंडखोरी रोखण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहे. विद्यमान नगरसेवकांना टक्कर देण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांना खूपच मेहनत घ्यावी लागणार आहे.
प्रभागातील समाविष्ट भाग
येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालय, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे रंगमंदिर, कुमार आंगण हौसिंग सोसायटी, मदर टेरेसा नगर, काश्मिरी कॉलनी, येरवडा, जनतानगर, साळवेनगर, कामराजनगर, येरवडा भाजी मार्केट, गणेशनगर, अशोकनगर, सुरक्षानगर, एकता हौसिंग सोसायटी, येरवडा फायर स्टेशन, डेक्कन कॉलेज, जय जवान नगर, रणजीतनगर, लक्ष्मीनगर पार्ट, तारकेश्वर मंदिर, राजीव गांधी हॉस्पिटल, रामनगर हा भाग प्रभाग रचनेत आहे. जुन्या प्रभाग रचनेतील यशवंत नगरचा काही भाग बाराथे वस्ती, नवी खडकी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी, हरीगंगा सोसायटी आदी भाग वगळण्यात आला आहे.
विद्यमान नगरसेवक
गेल्या पंचवार्षिकमध्ये केलेले विशेष काम
आंबेडकर चौक, बिंदूमाधव ठाकरे चौकाचे सुशोभिकरण केले. मुख्य रस्त्यावर महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह उभारली, तारकेश्वर टेकडीवर तीस लाखांची पाण्याची टाकी बांधली, डॉ. चिमा उद्यानात 45 मीटर ध्वजस्तंभाची उभारणी केली. संजय भोसले (शिवसेना)
प्रभागातील ड्रेनेज आणि पावसाळी लाइनचा प्रश्न गंभीर होता, तो मार्गी लावला. पिण्याचे पाणी पुरेसे उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले. कोविड काळात प्रभागात कोविड सेंटरची उभारणी, स्वॅब सेंटरची उभारणी केल्याने उपचारासाठी मदत झाली. अनेकांना रेशनिंग किट वाटप केले.ऍड. अविनाश साळवे (शिवसेना)
प्रभागातील रस्ते सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे काम केले. महिलांना रोजगार मिळून त्यांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून नर्सिंग कोर्स, ब्युटी पार्लरचे कोर्स घेऊन मागील सहा महिन्यांत जवळपास 70 युवतींना प्रतिष्ठित रुग्णालयात नोकरी मिळवून दिली. श्वेता चव्हाण (शिवसेना)
झोपडपट्टीवासीयांना शहरी गरीब योजनेंतर्गत 100 टक्के मोफत औषधोपचार करून देण्यास मदत, अल्प उत्पन्न गटातील रुग्णांना मोठे ऑपरेशन मोफत करून देण्यास मदत. गेल्या पाच वर्षांमध्ये एकूण 25 ते 30 कोटी रुपयांपर्यंतची गरीब रुग्णांची बिले माफ केली.अश्विनी लांडगे (एमआयएमआयएम)
गतपंचवार्षिकचे लढवय्ये जनसेवक
प्रभागातील कामांबाबत त्यांचे मत…
नागरिकांसाठी महत्त्वाचे असलेले प्रश्न सोडून चौकांच्या सुशोभिकरणावर पाच वर्षातील जवळपास सर्वच निधी खर्च केला गेला आहे. भाजी मंडईचा प्रश्न कायम असून ती उभारण्यात आलेलीच नाही. क्रीडांगण नाही, उद्याने नाहीत, पालिकेच्या शाळांची दुरवस्था झाली आहे.संतोष राजगुरू (भाजप)
नगरसेवक मागील पाच वर्षांमध्ये प्रभागात कोठेच दिसले नाहीत. समस्या सोडवण्यात ते कधीही अग्रेसर राहिले नाहीत. या निवडणुकीत निवडून दिल्यास संपूर्ण प्रभागाचा विकासरूपी कायापालट केल्याशिवाय राहणार नाही व नागरिकांच्या नित्याच्या समस्यांना नेहमी प्राधान्य राहील.शैलेंद्र भोसले (एमआयएमआयएम)
राजीव गांधी रुग्णालय नुतनीकरण केले असले तरी नागरिकांच्या समस्या कायम आहेत. पूर्वी जे प्रश्न प्रभागात होते ते अद्यापही कायम आहेत, ते सोडविण्याला प्राधान्यच दिले गेलेले नाही. प्रभागात निधी आणल्याचे सर्वच जण सांगत आहेत. काम झालेले मात्र कोठेच दिसत नाही.सायरा शेख (एमआयएमआयएम)
पाच वर्षांत चौकांचे सुशोभिकरणाचेच काम मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. रस्ते, ड्रेनेजलाइन, पाणी, स्वच्छतागृह या मूलभूत समस्यांकडे चारही नगरसेवकांनी दुर्लक्ष केले आहे. भाजीमंडईचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून सुटलेला नसल्याने परिसरात मोठी वाहतूक कोंडी होते.अर्चना माछरेकर (मनसे)
2022 निवडणुकीसाठी इच्छुक
राष्ट्रवादी कॉंग्रेस : शिवाजी क्षीरसागर, अक्षता राजगुरू, हनिफ शेख, रूपेश गायकवाड. भाजप : किशोर विटकर, संतोष राजगुरू, किशोर वाघमारे, अन्वर पठाण, रमेश गव्हाणे, विकास सोनवणे. शिवसेना : संजय भोसले, अविनाश साळवे, श्वेता चव्हाण, आनंद गोयल, शैलेश ऊर्फ पाला मोरे. कॉंग्रेस : संतोष आरडे, ज्ञानेश्वर मोझे, हाजी झाकीर शेख, विशाल मलके, समीर शेख, विल्सन चंदेवळ, ज्योती चंदेवळ, अरुण वाघमारे. मनसे : किर्ती माछरेकर, अर्चना माछरेकर, सुनील कदम, जेमा चव्हाण, रूपेश घोलप, लक्ष्मण काते, प्रविण मिसाळ. एमआयएमआयएम : डॅनियल लांडगे, अश्विनी लांडगे, शैलेंद्र भोसले. इतर इच्छुक : इलियास शेख, अदिवा इंदेकर, सुहास कांबळे, अहमद शेख, इमाम शेख, मनोज शेट्टी, श्रद्धा शेट्टी, तौसिफ शेख.





