Pune : फेक ॲप, स्क्रीनशॉटमुळे विक्रेत्यांचा पाय गाळात

पुणे – नोटबंदीनंतर डिजिटल पेमेंटचा सुरू झालेला पायंडा कोरोना काळात आणखी फोफावला. नागरिक खिशात पैसे ठेवण्याऐवजी मोबाइलच्या माध्यमातून ऑनलाइन पेमेंट करू लागले. अगदी पाच ते दहा रुपयांच्या वस्तूपासून ते लाखो रुपयांचे व्यवहार क्यूआर कोड स्कॅन करून होऊ लागले.
अगदी पान टपरीपासून ते भाजी विक्रेते, पथारीवाले, हातगाडीवर व्यवसाय करणारे विक्रेतेही ऑनलाइन पेमेंट घेत आहेत. मात्र, काही भामट्यांनी याचा गैरफायदा घेऊन बनावट ॲप्लिकेशन आणि स्क्रीनशॉटचा वापर करून पेमेंट ऑनलाइन झाल्याचे भासवून फसवणूक सुरू केली आहे.
सध्या जवळपास सर्वच विक्रेत्यांनी ऑनलाइन पेमेंट घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गर्दीच्या वेळी काही महाभागांनी पेमेंट केल्याचे बनावट ऍपवर किंवा स्क्रीनशॉट दाखवून फसवणूक केल्याचे गुन्हे शहर, तसेच उपनगरांत घडले आहेत. ज्या प्रचलित ॲपच्या माध्यमातून पेमेंट केले जाते, तसेच हुबेहूब ऍप दाखवून हे भामटे विक्रेत्यांना गंडा घालत आहेत.
अशा भामट्यांकडे वेगवेगळ्या रकमेचे पेमेंट केल्याच स्क्रीनशॉट असतात किंवा बनावट ॲपच्या माध्यमातून विक्रेत्याने सांगितल्यानुसार पैसे टाकून त्याचा स्क्रीनशॉट बनवतात. त्यानंतर विक्रेत्याच्या स्कॅनरवर स्कॅन केल्याचा बनाव करून आर्थिक फसवणूक करत असतात.
आधी खात्री करा…
विक्रेत्यांनी ग्राहकाला वस्तू किंवा सेवा देण्यापूर्वी पैसे आपल्या बँक खात्यात आल्याची खात्री करावी. त्याचा मेसेज मोबाइलवर आल्याची तपासणी करणे गरजेचे आहे. स्क्रीनशॉटवर अवलंबून राहण्याऐवजी, पेमेंट नक्की झाले आहे ना, यासाठी अन्य पर्यायांचा अवलंब करा. मोठ्या रकमेचे ट्रान्झेक्शन असेल, तर बँकेकडून ई-मेल अथवा एसएमएस आल्याची खात्री केल्यास अशा फसवणुकीपासून सुटका होऊ शकते.
ऍप स्पीकरची मदत
बहुतांश युपीआय पेमेंट सुविधा देणाऱ्या कंपन्यांकडून स्पीकर सेवा दिली जाते. मात्र, त्यासाठी विक्रेत्यांचे पैसे कापून घेतले जातात. त्यामुळे अनेक विक्रेते ही सुविधा घेण्यास नकार देतात. खरंतर या सोयीसाठी व्यवसायातील किरकोळ रक्कम मोजावी लागते; पण त्यामुळे पैसे खात्यावर आल्याची शंभर टक्के हमी मिळते, हेही लक्षात घेतले पाहिजे.





