PUNE: न्यायालय आवारात हवी वाय-फायसारखी सुविधा

पुणे – शिवाजीनगर न्यायालयामध्ये वाय-फायसारख्या पायाभूत सुविधेचा अभाव आहे. न्यायालय आवारात मोबाइल आणि इंटरनेटच्या अभावामुळे वकिलांना ई-फायलिंगसाठी अडथळे येत आहेत. कार्यक्षम आणि प्रगतशील न्यायव्यवस्थेची गंभीरता ओळखून ई-फायलिंग पद्धतीमधील विसंगती दूर करावी. तसेच नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरला चालना देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी अॅड. राकेश सोनार यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्राद्वारे केली आहे.
न्यायालयाची प्रक्रिया कागदविरहित करण्यासाठी आणि पक्षकारांचा वेळ व पैसा वाचविण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात ई-फायलिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पण, या प्रक्रियेला सामोरे जाताना पक्षकारांसह वकिलांनाही अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. वारंवार बंद पडणारे संकेतस्थळ, कागदपत्रे अपलोड करताना लागणारा ओटीपी, ई-फायलिंग करूनही न्यायालयात हजर झाल्यानंतर सादर करावी लागणारी कागदपत्रे या समस्यांमुळे ई-फायलिंगची सुविधा ही सोयीपेक्षाही गैरसोयीचीच अधिक ठरत आहे. पक्षकारांसह वकिलांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे अॅड. राकेश सोनार यांनी पत्राद्वारे सरन्यायाधीशांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.





