Pune : सवलतीत मिळकतकर भरण्यास मुदतवाढ ?

पुणे : महापालिकेच्या मिळकतकराचे उत्पन्न घटल्याने तसेच नागरिकांना कर भरण्यात अडचणी येत असल्याने, प्रशासनाने सवलतीत कर भरण्यासाठी असलेली मुदत १५ दिवसांनी वाढविली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. त्यासाठीचा प्रस्ताव कर संकलन विभागाने तयार केला असून, तो पालिका आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे. सध्या नागरिकांना सवलतीत कर भरण्याची मुदत ३० जून आहे.
दरवर्षी नागरिकांना चालू आर्थिक वर्षाची मिळकतकराची बीले पालिका १ एप्रिलपासून देते. त्यानंतर पुढे ३१ मेपर्यंत कर भरणाऱ्या नागरिकांना सर्वसाधारण करात ५ ते १० टक्के सवलत दिली जाते. मात्र, मागील वर्षी पालिकेने निवासी मिळकतीत स्वत: राहणाऱ्या करदात्यांना ४० टक्के सवलत देण्यासाठी सर्वेक्षण केले आहे.
त्याद्वारे संकलित केलेल्या अर्जांची नोंदणी बाकी असल्याने, पालिकेने १ मे पासून नागरिकांना मिळकतींची बिले दिली आहेत. बिले महिनाभर उशीरा दिल्याने नागरिकांना सवलतीत कर भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतरही पालिकेस अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने ही सवलत १५ दिवसांनी वाढविण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे.
माजी नगरसेवकांचीही मागणी
सवलतीत मिळकतकर भरण्याची अंतिम मुदत ३० जूनपर्यंत असली तरी त्यातील अडचणी लक्षात घेता, ही मुदत १५ जुलैपर्यंत वाढवावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी महापालिकेकडे केली आहे. पीटी-३ फॉर्म संदर्भातील तांत्रिक अडचणी अद्यापही कायम आहेत.
त्यातच, पालिकेचा सर्व्हर वारंवार बंद पडत असून, अभय योजना जाहीर होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे कर भरू इच्छिणाऱ्या नागरिकांना वेळेत कर भरण्यात अडचणी येत असल्याने मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.





