Pune | अभय योजनेला मुदतवाढ; थकबाकीमुळे वीज तोडलेल्या ग्राहकांना संधी

पुणे – बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजनेस ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी केले.
राज्यातील महावितरणच्या ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी १ सप्टेंबरपासून अभय योजना सुरू केली होती. योजनेचा कालावधी ३० नोव्हेंबर रोजी संपत आहे. या योजनेस एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे योजनेत अजूनही सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
राज्यातील ६५,४४५ वीज ग्राहकांनी आतापर्यंत योजनेचा लाभ घेतला असून, त्यांच्याकडून ८६ कोटी रुपयांचा भरणा झाला आहे. त्यांना ४४ कोटी ३५ लाख रुपयांचे व्याज व विलंब आकार माफ झाला आहे. यात पुणे विभागातील १७ हजार ४४८ ग्राहकांनी याचा लाभ घेतला आहे.
अभय योजनेत मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम सहा हफ्त्यांत भरायची सवलत ग्राहकांना देण्यात आली आहे. जे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एक रकमी थकीत बिल भरतील त्यांना दहा टक्के, तर उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत आहे, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.





