PUNE: महापालिकेच्या भरतीत अनुभवाची अट रद्द

पुणे – महापालिकेत यापुढे कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रीयेतून उमेदवारांसाठी असलेली अनुभवाची अट रद्द केली जाणार आहे. अनुभवाच्या अटीच्या तक्रारींंवरून यापूर्वी राबविलेल्या भरती प्रक्रीयेत मोठा वेळ गेला. या शिवाय, राज्यातील अनेक प्रमुख महापालिकांमध्ये अनुभवाची अट नसल्याने महापालिकेने हा निर्णय घेतला असून त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यास शासनाने तत्वत: मान्यता दिली असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
दरम्यान, महापालिकेकडून लवकरच तिसर्या टप्प्यातील भरती प्रक्रीया राबविली जाणार असून त्यापूर्वीच हा निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ही अट रद्द करण्यासाठी महापालिकेस सेवा प्रवेश नियमावलीत बदल करावा लागणार असल्याने पालिकेने आपल्या सेवा प्रवेश नियमावलीत बदल करून अनुभवाची अट काढून टाकण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार स्थायी समिती, सर्वसाधारण सभेची मान्यता घेत हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. नगरविकास विभागाने हा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवला. शिंदे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. दरम्यान, पुढील वर्षाच्या सुरूवातीलाच महापालिकेकडून सुमारे १०० ते १५० पदांसाठी भरती प्रक्रीया राबविण्यात येणार आहे.
…म्हणून केली जाणार अट रद्द
महापालिकेने काही महिन्यांपूर्वी कनिष्ठ अभियंता पदाच्या ४४५ जागांसाठी भरतीप्रक्रिया राबवली होती. यासाठी तीन वर्षांच्या अनुभवाची अट होती. त्यासाठी प्राप्तीकर विवरणपत्र, भविष्य निर्वाह निधीची कागदपत्रे, बँकेचे स्टेटमेंट, सनदी लेखापालांचे प्रमाणपत्र आदी पुरावे सादर करणे आवश्यक होते. दरम्यान, लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या काही उमेदवारांनी अनुभव सिद्ध करण्यासाठी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याची तक्रार करण्यात आली होती.
महापालिकेने त्यानंतर पुन्हा पडताळणी केली असता हा प्रकार समोर आला. त्यानंतर महापालिकेने पिंपरी-चिंचवड महापालिकेस इतर काही पालिकांमध्ये माहिती घेतली असता ही अटच नसल्याचे निदर्शनास आल्याने पालिकेने हा निर्णय घेतल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.





