पुणे : पक्ष वाढविणे म्हणजे स्व-बळाचा नारा देणे असे होत नाही. अगामी निवडणुकांमध्ये बोलणी करताना आम्हाला आमची संघटना मजबूत पाहिजे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात संघटना बांधताना बाकीच्यांना दखल घ्यावी लागेल एवढ्या मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी करायची आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी पक्षाचे नेतृत्व आणि शिवसेना या शब्दाला जागून एकजुटीने काम करण्याचे आवाहन केल्याचे शिवसेनेचे नेते व राज्याचे उद्योग व मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शिवसेना पुणे शहर आणि जिल्हा संवाद बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे, आमदार विजय शिवतरे, शरद सोनवणे, माजी आमदार रविंद्र धंगेकर, शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे उपस्थित होते. आमदार शरद सोनवणे यांनी बारामतीतील सहाही मतदारसंघातील जागा मिळविण्याचा उल्लेख भाषणात केला. असे उदय सामंत यांना विचारले असता, प्रत्येक पक्षाला आपली संघटना वाढविण्याचा अधिकार आहे, असे वक्तव्य स्वत: अजित पवार म्हणाले होते. त्याच पध्दतीचे हे व्यक्तव्य आहे. त्यामुळे त्याचा विपर्यास करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील मैत्रीबाबत उदय सामंतांना गैरसमज असल्याचे व्यक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केल्याचे विचारल्यावर उदय सामंत म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची राजकारणापलीकडची दोस्ती आहे. दोस्ती करून त्यांनी कधीही एकमेकांचा विश्वासघात केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या मैत्रीत कोणीही विषाचा खडा टाकू शकत नाही, मैत्री तोडू शकत नाही. असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. पुण्यात संघटना नाही असे नाही. येत्या वर्षभरात शिवसेना जोमाने संघटना बांधणीचे काम करेल. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा घेऊनच आम्ही पुढे जात आहोत. त्यामुळेच उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे कौटुंबिक वारसातले नसले तरी विचारांचे वारसदार आहेत हे निवडणुकीतून सिध्द झाले आहे, असेही सामंत यांनी स्पष्ट केले. धंगेकरांवर मोठी जबाबदारी माजी आमदार रविंद्र धंगेकर यांच्यावरही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी जबाबदारी दिली असून, ते पार पाडत आहेत. त्याबाबत सर्वांना येत्या आठ ते दहा दिवसात समजेल. असे उदय सामंत यांनी सांगितल्यावर शिवसेनेचा पुण्यातील चेहरा रविंद्र धंगेकर असतील का? असा प्रश्न विचारल्यावर धंगेकरांनी शिंदे साहेबांचे नेतृत्व पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. जनसामान्यांकडून उठाव झाला तर पक्षाकडून धंगेकरांना संधी दिली जाईल. किंवा ती संधी मला, विजय शिवतरे, नीलम गोऱ्हेंनाही देतील असे सामंत यांनी सांगितले. आॅपरेशन टायगरही धंगेकर पाहतील, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.