Pune News : पुण्यात वर्षभराच्या पगाराएवढी लाच घेताना एक्साईज निरीक्षकाला अटक
Pune News : तब्बल ११ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बेड्या ठोकल्या आहेत.

Pune News : एफएल-३ मद्यविक्री परवाना आणि मायक्रो ब्रुअरीच्या फाइलला मंजुरी देण्यासाठी ११ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक जितेंद्र हरिश्चंद्र पाटील (वय ४७) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. (Pune News)
याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यवसायाने लायसन्स कन्सल्टंट आहेत. (Pune News)
त्यांनी एका फर्मचा एफएल-३ परवाना मिळवून देण्यासाठी दाखल केलेली फाइल पुढे पाठविण्याबाबत तसेच त्याच फर्मच्या मायक्रो ब्रुअरीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळवून देण्यासाठी आरोपी निरीक्षक जितेंद्र पाटील यांनी सुरुवातीला एकूण २० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यामध्ये एफएल-३ परवान्यासाठी १२ लाख आणि मायक्रो ब्रुअरीच्या फाइलसाठी ८ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. (Pune News)
याबाबत तक्रारदाराने १० एप्रिल २०२६ रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर १३ एप्रिल, २१ मे आणि २२ मे रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत आरोपीने एकूण २२ लाख रुपयांची मागणी करून अखेरीस तडजोडीअंती ११ लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे निष्पन्न झाले. (Pune News)
या निष्कर्षानंतर एसीबीने कारवाई करत १० ऑगस्ट २०२६ रोजी येरवडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल केला. त्याच दिवशी सायंकाळी ५.१० वाजता आरोपी जितेंद्र पाटील याला अटक करण्यात आली. (Pune News)
या कारवाईचे नेतृत्व पोलीस उपअधीक्षक सतिश वाळके यांनी केले. पोलीस शिपाई भूषण ठाकूर, विशाल माने, विकास आडके, महिला पोलीस हवालदार वनिता गोरे आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत कदम यांनी पथकात सहभाग घेतला. या कारवाईस पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. (Pune News)
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही लोकसेवक लाचेची मागणी करत असल्यास किंवा भ्रष्टाचाराबाबत माहिती असल्यास तातडीने एसीबीशी संपर्क साधून तक्रार करा. (Pune News)





