Pune: माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर भररस्त्यात गोळीबार; सीसीटीव्ही फुटेज समोर

पुणे : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री नाना पेठेत घडली. आंदेकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा पोलिसांकडून शोध घेण्याात येत आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर माजी नगरसेवकावर गोळीबार करण्यात आल्याने मध्यभागात घबराट पसरली आहे.
वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोराने पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात घबराट उडाली. गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात मोठी टोळी भररस्त्यात वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करताना दिसत आहे. तसेच वनराज आंदेकर यांच्यावर कोयत्याने देखील वार करण्यात आला.
दरम्यान, वनराज यांच्यावर निकटवर्तीयाने गोळीबार केला असून, कौटुंबिक वाद तसेच वर्चस्वाच्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.





