Pune : पारा चढूनही कुलरची खरेदी थंडचं!

पुणे : पुण्यात ठिकठिकणी उष्णतेचा पारा ४० डिग्रीवर पोहोचला असून, बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे कुलर मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. मात्र, उन्हाळ्याची झळ तितकीशी वाढली नसल्याने कुलर खरेदीला पुणेकरांचा प्रतिसाद थंडच आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात जास्त उष्णता असल्याने यावर्षी पेक्षा जास्त कुलर विक्री झाल्याची माहिती दुकानदारांनी दिली.
होळीनंतर थंडी संपून उन्हाळा सुरू होतो, अशी मान्यता आपल्याकडे आहे. उन्हाळा सुरू होऊन तीन आठवडे उलटले आहेत. त्यात यंदा हिवाळाही विशेष जाणवला नाही. यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच अनेक ठिकाणी तापमानाने ३५ डिग्री सेल्सिअसचा टप्पा पार केला होता, तर मार्च महिना संपता संपता अनेक ठिकाणी तापमानाने ४० डिग्री सेल्सियसचा टप्पा पार केला आहे.
अशात यंदाचा उन्हाळा दरवर्षीपेक्षा जास्त असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात उष्माघाताने एकाचा बळीदेखील घेतला. त्याशिवाय राज्य सरकारने उष्णतेच्या लाटांसाठी तयारी करण्याचे आदेश विविध सरकारी यंत्रणांना दिले आहेत. राज्यातील बहुतांश जनतेला एअर कंडिशनर घेणे शक्य नसल्याने कुलर एक उत्तम पर्याय ठरतो. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त ७० टक्के मागणी असून, वाढत्या उन्हासोबत ही मागणी वाढेल, अशी आशा दुकानदार व्यक्त करत आहेत. ब्रँडेड कुलरसोबतच थंड हवा देणारे आणि तुलनेने स्वस्त नागपुरी कुलर बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत.
लोक कुलर खरेदी करत आहेत. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मागणी कमी आहे. बाजारात सध्या ब्रॅंडेड आणि नागपुरी असे दोन प्रकारचे कुलर उपलब्ध आहेत. नागपुरी कुलर जास्त थंड हवा देत असल्याने त्याकडे ग्राहकांचा कल जास्त दिसत आहे.
– विनोद कुमार, पद्मावती कुलर्स, तपकीर गल्लीनागपुरी कुलरची किंमत ब्रँडेड कुलरपेक्षा कमी असते. शिवाय तो जास्त थंड हवा देतो. त्यामुळे ग्राहकांची पहिली पसंदी नागपुरी कुलरला दिसते. गेल्या वर्षीच्या तुलनेत कुलरला सध्या फक्त ७० टक्के मागणी आहे.
– प्रताप कुमार, कन्हैया इलेक्ट्रॉनिक्स, तपकीर गल्लीसध्या कुलरला गतवर्षीपेक्षा कमी मागणी आहे. स्वस्त आणि मस्त कुलर घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे. त्यातही नागपुरी कुलर्सला जास्त मागणी आहे. ब्रँडेड कुलर्स जास्त काळ टिकतात. मात्र, स्वस्त नागपुरी कुलर्स जास्त थंड हवा देतात. त्यांचा देखभाल खर्च थोडा जास्त आहे.
– सतिश पुरोहीत, जयश्री इलेक्ट्रॉनिक्स





