Pune : पुण्यात इलेक्ट्रिक डबल डेकर धावली

पुणे – शहरात मंगलवारी कात्रज-हिंजवडी मार्गावर पहिल्यांदाच इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावली. सध्या प्रायोगिक तत्वावर बसची चाचणी सुरू असून, पुढील आठ ते दहा दिवसात आणखीन तीन मार्गावर बसची चाचणी होईल. ती यशस्वी झाल्यावर डबल डेकर बस खरेदीचा प्रस्ताव संचालक मंडळाकडून मंजूर होईल. त्यानंतर डबल डेकर बसचा मार्ग मोकळा होईल. पहिल्या टप्यात १० डबल डेकर बस घेण्याचा विचार आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) चाचणी घेतलेली बस स्वीच कंपनीची असून ती इलेक्ट्रिक, वातानाकुलीत आणि अत्याधुनिक सुविधा असलेली आहे. शहर प्रदूषणमुक्त वाहतुकीकडे महत्त्वाचे पाऊल म्हणजे इलेक्ट्रिक डबल डेकर.
चाचणीवेळी पीएमपीएमएल अध्यक्ष पंकज देवरे, व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतुक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीकडे वळविणे ही मोठी गरज आहे. डबल डेकर बस एका फेरीत ८० हून अधिक प्रवासी प्रवास करतात.
ती पुन्हा धावणार…
शहरात १९९५ च्या आधी डबल डेकर बस धावत होत्या. त्या डिझेलवर होत्या. त्या जुन्या झाल्यावर पुन्हा खरेदी झाली नाही. आता २५ ते ३० वर्षानंतर पुन्हा डबल डेकर धावणार आहे.
चार मार्गांवर चाचणी
– हिंजवडी फेज ३ ते हिंजवडी फेज ३ (वर्तुळ मार्ग)
– रामवाडी मेट्रो स्टेशन ते खराडी
– मगरपट्टा सीटी ते कल्याणीनगर मेट्रो स्टेशन
– पुणे स्टेशन ते लोहगाव विमानतळ मार्गे विमाननगर
वैशिष्ट्ये
– कंपनी : स्विच मोबिलिटी
– प्रवासी क्षमता : ६० (बसून), २५ (उभे) एकूण ८५
आकारमान : उंची ४.७५ मीटर, रुंदी २.६ मीटर, लांबी ९.५ मीटर
– किंमत : अंदाजे २ कोटी
– बॅटरी रेंज : १५० किमी
– तंत्रज्ञान : पूर्णपणे इलेक्ट्रिक, वातानुकूलित, पर्यावरणपूरक
– डिझाइन : लंडनच्या लाल बसच्या धर्तीवर बसची रचना





