Pune Election Results – तालुक्याच्या राजकारणात ऐतिहासिक उलथापालथ घडवत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये अभूतपूर्व यश मिळवले आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व ८ जागा आणि पंचायत समितीच्या सर्व १६ जागा मोठ्या फरकाने जिंकत भारतीय जनता पार्टीचा पूर्ण सुपडा साफ केला आहे. या विजयामुळे इंदापूर तालुका पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने राष्ट्रवादीमय झाला आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आशीर्वादाने उभ्या राहिलेल्या या राजकीय समीकरणाचा मोठा फायदा पक्षाला झाला. विशेष म्हणजे, अजितदादा पवार यांनी हर्षवर्धन पाटील व दत्तात्रय भरणे यांना एकत्र आणून या निवडणुकीचा जो प्रयोग केला होता,तो त्यांच्या निर्वाणानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या यशात परिवर्तित झाला आहे. वालचंदनगर-बोरी जिल्हा परिषद गटातून निर्मला सागर मिसाळ यांनी १७, ७८२ मते मिळवत भाजपच्या अमृता भोसले यांचा दारुण पराभव केला. लासुर्णे- सणसर गटात माधुरी सागर भिसे यांनी १७, ९८० मतांची घवघवीत आघाडी घेत भाजपला नामोहरम केले. भिगवण-शेटफळगडे गटात मेघना तुकाराम बंडगर यांनी तब्बल १९, १७६ मते घेत विजयाची नोंद केली.वडापुरी-माळवाडी गटात यशराज आप्पासाहेब जगदाळे यांनी १८, ३०६ मतांसह भाजपचा पराभव केला. हर्षवर्धन पाटील-दत्तात्रय भरणे पळसदेव-बिजवडी गटातून हर्षदा दीपक जाधव यांनी १८, ७७६ मतांची आघाडी घेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला. निमगाव केतकी-शेळगाव गटात सोनाली तुषार जाधव यांनी १९, ७५१ मते मिळवत एकतर्फी विजय मिळवला. काटी-लाखेवाडी गटात श्रीमंत पोपट ढोले २०, ७९९ यांनी भाजपचे विलास वाघमोडे यांचा पराभव केला. बावडा-लुमेवाडी गटात अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी विजय संपादन करत राष्ट्रवादीचा विजय पूर्णत्वास नेला. पंचायत समितीवरही राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता तालुक्यातील सर्व पंचायत समिती गणांमध्येही राष्ट्रवादीने वर्चस्व सिद्ध केले. बोरी, वालचंदनगर, लासुर्णे, सणसर, भिगवण्, शेटफळगडे, वडापुरी, माळवाडी, पळसदेव, बिजवडी, निमगाव केतकी, शेळगाव, काटी, लाखेवाडी, बावडा व लुमेवाडी या सर्व गणांत राष्ट्रवादीचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. भाजपला बहुतांश ठिकाणी अत्यल्प मते मिळाल्याने पक्षाची संघटनात्मक कमजोरी स्पष्ट झाली आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम इंदापूर तालुक्यातील या एकहाती विजयामुळे पुणे जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे वजन वाढले आहे. स्व. अजितदादा पवार यांची राजकीय दृष्टी आणि भरणे-पाटील यांची स्थानिक पकड यांचा मिलाफ किती प्रभावी ठरतो, याचे उदाहरण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळासह जनतेत सुरू आहे. तालुक्याने दिलेला हा कौल म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावरचा विश्वास असून, भाजपसाठी हा निकाल आत्मपरीक्षणाची गंभीर सूचना मानला जात आहे.