Pune: कैद्यांनाही पूर्ण करता येणार शिक्षण

पुणे – कैद्यांना त्याचे अर्धवट शिक्षण पूर्ण करण्यासाठी कारागृहातच उच्च शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व पुण्यातील महाराष्ट्र कारागृह विभाग यांच्यात नव्याने सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे कारागृहातील कैद्यांना उच्च शिक्षण पूर्ण करणे शक्य होणार आहे.
यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. संजीव सोनवणे व महाराष्ट्र कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे उपस्थित होते. आतापर्यंत मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून राज्यातील एकूण 2 हजार 199 पुरुष व 207 महिला असे एकूण 2 हजार 856 कैद्यांनी पदवी पूर्व परीक्षा, पदविका व पदवीचे शिक्षण प्राप्त केलेले आहे.
कारागृहात येणारा बंदी हा समाजाचाच एक घटक असतो. परंतु कळत नकळत त्याचे हातून एखादा गुन्हा घडल्यानंतर त्यास कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी बंदीस्त ठेवण्यात येते. बंदी कारागृहात आल्यानंतर त्याचे अर्धवट शिक्षण पूर्ण करण्यासाठी, कारागृहातच उच्च शिक्षणाची सोय या करारामुळे होणार आहे.
कारागृह विभागाच्या प्रचलित धोरणानुसार कारागृहात राहून मुक्त विद्यापीठामार्फत पदवीचे शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या बंद्यांना 90 दिवसापर्यंत माफी (शिक्षेत सुट) देण्यात येत असून आतापर्यंत एकूण 214 बंद्यांना 90 दिवस माफीचा लाभ देण्यात आलेला आहे. पदवीधर बंद्यांपैकी एकूण 16 बंद्यांनी उच्च पदवी शिक्षणक्रम पूर्ण केल्याने त्यांना पुन्हा 90 दिवसांची माफी देण्यात आलेली आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, विद्यापीठाचे पुणे विभागाचे सल्लागार डॉ. व्ही. बी. गायकवाड, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनिल ढमाळ, अतिरिक्त अधिक्षक पल्लवी कदम, उपअधिक्षक भाईदास ढोले, रविंद्र गायकवाड, श्रीकांत जावरकर, सोमनाथ पाडुळे आदी उपस्थित होते.
“सद्यस्थितीत येरवडा, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, मुंबई, तळोजा, ठाणे, औरंगाबाद, नाशिक या मध्यवर्ती कारागृह व कल्याण जिल्हा कारागृह अशा एकुण 10 कारागृहांत विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र आहेत. या शिक्षणामुळे कारागृहातील बंद्यांना तुरुंगातून मुक्त झाल्यानंतर चांगले जीवन जगण्याची संधी मिळते.” – डाॅ. संजीव सोनवणे, कुलगुरू, य. च. म. मुक्त विद्यापीठ.





