Pune : आरटीओ प्रशासनाकडून जप्त वाहनांचा ई- लिलाव

पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या वतीने जप्त करण्यात आलेल्या विविध प्रकारची एकूण १६५ निष्क्रिय वाहने ई- लिलावाच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या लिलावासाठी अर्ज व पात्रता तपासणीची अंतिम मुदत १३ मे २०२५ पर्यंत असून, लिलाव ९ मे आणि १५ मे २०२५ रोजी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
जप्त वाहने दोन टप्प्यांत लिलावात सहभागी करण्यात आली आहेत. २१ वाहने www.eauction.gov.in या पोर्टलवर १५ मे रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत लिलावात येतील, तर उर्वरित १४४ वाहने www.mstcindia.co.in या पोर्टलवर ९ मे रोजी १२ ते ४ या वेळेत लिलावात उपलब्ध राहतील. ई- लिलावात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी शुल्कासह अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
लिलावात जिंकलेले वाहन स्क्रॅपिंगसाठी अधिकृत केंद्राकडे सुपूर्द करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी लिलाव ऑनलाइन माध्यमातून होणार असून, इच्छुकांनी संबंधित वेबसाइटवर आवश्यक नोंदणी करून सहभागी व्हावे, असे आवाहन आरटीओ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





