पुणे : ‘दहीहंडी’मुळे सायंकाळी 5 नंतर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

पुणे – “दहीहंडी सोहळा’ गोविंदा पथके आणि गोपाळ भक्तांसाठी उत्साह आणि उर्जा देणारा. मागील दोन वर्षांपासून करोनाच्या संकटामुळे सण-उत्सव साजरे करता आले नाही. यावर्षी सर्व निर्बंध हटविण्यात आले असून, दहीहंडी उत्साहात साजरी करण्यासाठी सर्व मंडळांनी जय्यत तयारी केली आहे.
पुणे शहरासह उपनगरातील हा दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी परराज्यासह परदेशातून नागरिक येत असतात. शहरातील मध्यवर्ती भागातील शिवाजीरोड, लक्ष्मीरोड, बाजीराव रोड, टिळक रोडवर सायंकाळी दहीहंडी पाहण्यासाठी गोपाळभक्तांची मोठी गर्दी होते. त्या पार्श्वभूमीवर वाहतुक कोंडी होऊ नये आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शुक्रवारी (दि. 19) सायंकाळी 5 वाजल्यापासून प्रमुख रस्त्यांवरील वाहतुक बंद ठेवण्यात येणार असून, वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन वाहतुक विभागाचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातील बुधवार चौक ते दत्तमंदीर चौक, बेलबाग चौक ते सेवासदन चौक, बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौक, मंडई चौक (बाबु गेणु चौक), साहित्य परिषद चौक, नवी पेठ इ. ठिकाणी भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे येथील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इ.) वगळता सर्व वाहनांना रस्ता बंद असून, आवश्यकते नुसार वाहतुक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात येतील.
सायंकाळी 5 नंतर या रस्त्यावरील वाहतुकीत बदल
– शिवाजीरोड वरुन स्वारगेटला जाणाऱ्या वाहन चालकांसाठी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजी बाबा चौक, टिळक चौक पुढे टिळकरोडने/शास्त्री रोडने इच्छित स्थळी जातील.
– पुरम चौकातुन बाजीराव रोडवरून शिवाजीनगर कडे जाणाऱ्या वाहन चालकांसाठी पुरम चौकातुन टिळक रोडने-अलका टॉकीज चौक व पुढे एफ. सी. रोडने इच्छित स्थळी जातील. तसेच पुरम चौकातुन सेनादत्त चौकाकडे व पुढे इच्छित स्थळी जातील.
– स. गो. बर्वे चौकातुन पुणे मनपा भवनकडे जाणारे शिवाजी रोडने जाणारे वाहन चालकांसाठी स. गो. बर्वे चौकातुन जंगली महाराज रोडने झाशी राणी चौक डावीकडे वळुन इच्छितस्थळी जातील.
– बुधवार चौकाकडुन आप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतुक सोडण्यात येवुन आप्पा बळवंत चौकातुन बुधवार चौकाकडे येणारी वाहतुक बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छितस्थळी जातील.
– रामेश्वर चौक ते शनिपार चौकाकडे येणारी वाहतुक बंद करण्यात येत असुन पर्यायी मार्गाचा वापर करावा.
– सोन्या मारुती चौकाकडुन लक्ष्मी रोडने सरळ सेवासदन चौकाकडे वाहतुकीकरिता बंद करण्यात येत आहे. सदरची वाहने सोन्या मारुती चौकातुन उजवीकडे वळुन फडके हौद चौकातुन इच्छित स्थळी जातील.





