PUNE: कसबा मतदारसंघात घरोघरी दिव्यांचे वाटप; आमदार रवींद्र धंगेकर यांचा पुढाकार

पुणे – अयोध्या येथील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा क्षण जवळ आला आहे. यानिमित्त कसबा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे आपल्या मतदारसंघासह शहरात विविध उपक्रम घेत आहेत. या अंतर्गत दिग्दर्शक-अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्या खिशाला प्रभू श्रीरामाची प्रतिमा (बॅच) लावत त्यांनी जय श्री राम अशा घोषणा दिल्या.
निमित्त होते दक्षिण पुण्यामध्ये वैचारिक देवाण-घेवाणीचे व्यासपीठ ठरलेल्या ऐश्वर्य कट्ट्यावर झालेल्या विविध नामवंतांच्या भेटीचे. श्रीराम हे कोण्या एका पक्षाचे किंवा एका व्यक्तीचे नाहीत. श्रीराम आपल्या सर्वांचे आहेत, अशी भूमिका आमदार धंगेकर यांनी मांडली आहे.
एक दिवा आपल्या श्रीरामासाठी असा दीपोत्सवाचा अनोखा उपक्रम धंगेकर यांनी कसबा विधानसभा मतदारसंघात नुकताच आयोजित केला होता. यात उत्स्फूर्तपणे असंख्य रामभक्त नागरिक आपल्या कुटुंबासह सहभागी झाले होते. येणाऱ्या २२ तारखेला दिवाळी साजरी करता यावी म्हणून हिंदमाता प्रतिष्ठानच्या वतीने घरोघरी दिव्यांचे वाटपही केले जात आहे.
अप्पा रेणुसे आणि मित्र परिवार यांनी आयोजित केलेल्या ऐश्वर्य कट्टा या उपक्रमात धंगेकर हे माजी उपमहापौर दिलीप बराटे, अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्यासमवेत सहभागी झाले होते.





