पुणे – कोंढवा येथील उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या संगणक अभियंता तरुणीवर कथित बलात्कार प्रकरणात आता एका प्रसिद्ध डॉक्टरची एन्ट्री झाली आहे. याप्रकरणी एका प्रसिद्ध महाविद्यालयातील प्राध्यापक महिलेचा जबाब नोंदविल्यानंतर खळबळ माजली होती. हा डॉक्टर प्राध्यापक महिलेशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती आहे. कथित बलात्कार प्रकरणाला दिवसेंदिवस वेगवेगळे वळण मिळत आहे. पोलिसांचा तपास पूर्ण झाला असून, बलात्काराची तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे. आता पोलीस क्लोजर रिपोर्टच्या तयारीत आहेत. मात्र, तपासात दररोज वेगवेगळा ट्विस्ट निर्माण होत आहे. दरम्यान, या डॉक्टरचा पोलीस युद्धपातळीवर शोध घेत आहेत. प्राध्यापक महिला फ्रेंड, फिलॉसोफर आणि गाइडच्या भूमिकेत असताना डॉक्टरची भूमिका काय आहे? याचे गूढ मात्र समजू शकले नाही. मात्र, प्रकरणात डॉक्टरची एंट्री झाल्याने खळबळ माजली आहे. प्राध्यापक आणि डॉक्टर अनेक महिने एकमेकांच्या संपर्कात असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणात डॉक्टरचीही साक्ष नोंदविली जाणार आहे. पीडितेवर होऊ शकतो गुन्हा दाखल पोलिसांची दिशाभूल करून तब्बल ५०० पोलिसांना विनाकारण तपासाकामी लावल्याप्रकरणी पीडितेवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. गुन्हा दाखल झाल्यावर दुसऱ्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे शहरात होते. यातील त्यांचा एका दौरा कोंढव्यातही होता. यातच दिशाभूल करणाऱ्या तक्रारीमुळे पोलिसांवर बंदोबस्ताबरोबरच तपासाचाही दबाव निर्माण झाला होता.