Pune : वंचित मुलांच्याही चेहऱ्यावर खुलली दिवाळी…

पुणे, दि. 22 -आईबाबांचा हात धरून कपडे खरेदी करत बाजारपेठेत फेरफटका, तुळशीबागेत कानातले-गळ्यातले, टिकल्या-बांगड्या याची खरेदी या सगळ्या गोष्टींपासून वंचित असलेल्या मुलांची दिवाळी “श्री तुळशीबाग गणपती मंडळा’ने गोड केली आहे. “अपना घर’ संस्थेतील मुलींना शनिवारी त्यांनी तुळशीबागेत स्वत:च्या पसंतीने खरेदी करण्याचा आनंद लुटू दिला.
रंगीबेरंगी आकर्षक कपड्यांची स्वतः च्या पसंतीने पहिल्यांदाच तुळशीबागेत खरेदी करताना मुलींच्या चेहऱ्यावर आनंद ,कुतूहल आणि निरागस भाव लपू शकले नाहीत. तुळशीबागेतील खरेदीची मनात उत्सुकता, कुतूहल होतेच पण प्रत्यक्षात खरेदीसाठी आल्यावर त्यांना थोडे भांबावून गेल्यासारखे झाले. सुरूवातील बुजलेल्या या मुलींनी नंतर खरेदीचा मनसोक्त आनंद लुटला.
टिकली, नेल पॉलिश, बांगड्या, नेकलेस, मेंदीचे कोन, हेअर पीन्स, कानातले, नाकातले, रुमाल, कपडे अशी मनसोक्त खरेदी मुलींनी केल्यावर सुप्रसिद्ध कावरे यांच्या सॉफ्टी आईस्क्रीमची मेजवानीही त्यांना खिलवण्यात आली. श्री तुळशीबाग गणपती मंडळातर्फे गेल्या 15 वर्षांपासून हा उपक्रम तुळशीबागेतील व्यापाऱ्यांच्या सहकार्याने राबवत आहे. विकास पवार, विनायक कदम, जितेंद्र अंबासनकर, विकास कुलकर्णी, दिलीप पर्वतीकर, अमर शहा, प्रकाश पवार, प्रदीप इंगळे, राजेश शिंदे उपस्थित होते.
या उपक्रमाला किरण गाला, सागर गुळुमकर, मोहन साखरीया, दत्ताभाऊ कावरे, सौरभ कदम, पुनेश शर्मा, कुशल पारेख जितेंद्र अंबासनकर चंद्रशेखर लुणीया आदींनी सहकार्य केले.




