Pune : खर्चात बचत करून चेहऱ्यावर फुलवले दिवाळीचे हास्य

पुणे – दिवाळी उत्सव काळात आपण विविध गोष्टींवर खर्च करतो. त्यामध्ये बचत करून बांधकाम कामगारांच्या कुटुंबीयांना दिवाळीनिमित्त मदत करण्यात आली. हा सामाजिक उपक्रम कोथरुड येथील श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील विद्यालयाच्या वतीने राबवण्यात आला. या उपक्रमास विद्यार्थी, पालकांसह शाळेतील शिक्षकांनीही मदत केली.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री जावळे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. परिसरातील बांधकाम प्रकल्पांवरील कामगारांना दिवाळीचा आनंद मिळावा, यासाठी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर सेवकांच्या वतीने आर्थिक बचत करण्यात आली.
या जमलेल्या पैशांतून साखर, तांदूळ, रवा, हरभरा डाळ, तूर डाळ, सुगंधी साबण-तेल, पणती, उटणे असे साहित्य कामगारांच्या चार कुटुंबीयांना देण्यात आले. तसचे लहान मुलांना फटाक्यातील फुलबाजी, मेंदी व खाऊ देत दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. विशेष म्हणजे, या उपक्रमासाठी पालकांनीही मदत केली.
तसेच विद्यालयातील शिक्षक पठाण, कारोटे, खंडागळे, चौधरी, आत्राम तसेच सेवक बावीसकर व नीळकंठ यांनी सहकार्य केले. उपक्रमाबद्दल विद्यालयाच्या माजी सभापती ॠतुजादेवी संग्रामसिंह मोहिते पाटील व सदस्य डॉ. बाळकृष्ण गायकवाड यांनी विद्यार्थी-शिक्षकांचे कौतुक केले.





