Pune Divorce Case : आयटी कपलचा अजब संसार! नाश्ता, सहलीपासून घरखर्चापर्यंत ‘फिप्टी-फिप्टी’चा आग्रह; अखेर घटस्फोट
Pune Divorce Case : विवाहाच्या सुरुवातीपासूनच नाश्ता, जेवण आणि पर्यटनाच्या बिलावरून जोडप्यामध्ये सातत्याने खटके; अखेर सामंजस्याने घेतला घटस्फोट.

Pune Divorce Case – खर्चाची वाटणी तुझं तू, माझं मी, (टीटीएमएम) या भूमिकेची वैवाहिक जीवनात काटेकोरपणे करण्याच्या आग्रहामुळे एका दाम्पत्याचा संसार मोडला आहे. नाश्ता, जेवण, भेटवस्तू, पर्यटन आणि घरखर्च अशा प्रत्येक बाबतीत पत्नीने अर्धा खर्च उचलावा, यासाठी पती सातत्याने तगादा लावत होता. त्यातून मतभेद टोकाला गेल्यानंतर दोघांनी संमतीने घटस्फोट घेतला.
दोघेही आयटी क्षेत्रात कार्यरत असून पतीला मोठा पगार होता. तुलनेने पत्नी कमी कमावते. कुटुंबासाठी केलेल्या प्रत्येक खर्चाचा पती काटेकोर हिशेब ठेवत असे. हॉटेलात नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी गेल्यास बिलाची अर्धी रक्कम देण्याची अपेक्षा तो पत्नीकडून करत असे. इतकेच नव्हे तर पत्नीला दिलेल्या भेटवस्तूंचा अर्धा खर्चही तिने उचलावा, अशी त्याची भूमिका होती, असे पत्नीने दाव्यात नमूद केले आहे.
दोघांचा विवाह मे २०२३ मध्ये अरेंज मॅरेज पद्धतीने झाला. विवाहानंतर काही काळातच दोघांमधील संवाद कमी झाला. आठवड्यातून दोन- तीन वेळाच त्यांच्यात बोलणे होत असे. पत्नी माहेरी आर्थिक मदत करते, या संशयावरून वाद होत असे. गेल्या वर्षापासून दोघांमध्ये वैवाहिक संबंधही नव्हते. एकमेकांना वेळ न देणे, संवादाचा अभाव आणि सततचे आर्थिक वाद यामुळे अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ॲड. प्राजक्ता तारू यांच्यामार्फत दावा दाखल केला. त्यांना ॲड. सागर गिरी आणि ॲड. वैष्णवी मडेल यांनी मदत केली.
नऊ दिवसांत निकाल
घटस्फोटासाठी अर्ज दिल्यानंतर हे प्रकरण नऊ दिवसांत निकाली निघाले. १३ मे ला दावा दाखल झाला आणि २२ मे ला तो निकाली निघाला. दोन्ही बाजूंची भूमिका स्पष्ट असल्याने न्यायालयाने पहिल्याच सुनावणीत आदेश दिला. विशेष म्हणजे घटस्फोट प्रक्रियेचा संपूर्ण खर्च पत्नीने उचलला.
“प्रत्येक गोष्टीत खर्चाचे समान वाटप करण्याची पतीची भूमिका होती. आर्थिक स्वातंत्र्य आणि वैवाहिक नात्यातील अपेक्षा यामध्ये समतोल साधला गेला नाही. त्यातून वाद वाढल्याने त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. दोघे एक वर्षाहून अधिक काळ विभक्त राहत असल्याने प्रकरण त्वरित निकाली निघाले.”
– प्राजक्ता तारू, दाम्पत्याचे वकील




