सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मताधिक्य घटले मंचर – आंबेगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील विजयी झाले असले तरी त्यांचा हा विजय थोड्या मतांच्या फरकाने झाला आहे. वळसे पाटील यांना पडलेली मते व विरोधी महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांना पडलेली मते यात थोडाफारच फरक आहे. एकूण आठ जिल्हा परिषद गटांपैकी पाच जिल्हा परिषद गटात महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम आघाडीवर राहिले तर अवघ्या तीन जिल्हा परिषद गटात महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांना आघाडी मिळाल्याचे दिसून येते. भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये वळसे पाटलांना मोठा फटका बसण्याची शक्यता असून त्यांच्यासाठी हा धोक्याचा इशारा असल्याची चर्चा आंबेगाव विधानसभा मतदारसंघात रंगली आहे. आंबेगाव विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील व त्यांच्याच तालमीत तयार झालेले महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांच्यात समोरासमोर थेट लढत झाली. मात्र, या निवडणुकीत वळसे पाटील यांना मागील निवडणुकीत सुमारे ६६ हजार मतांचे मताधिक्य मिळून ते विजयी झाले. त्या तुलनेत यावेळी अवघ्या पंधराशे तेवीस मतांनी विजय माळ त्यांच्या गळ्यात पडली. वळसे पाटील हे स्वतःच्या पारगाव अवसरी जिल्हा परिषद गटात १२८८ मतांनी पिछाडीवर राहिले. कळंब चांडोली जिल्हा परिषद गटात वळसे पाटील १९२५ मतांनी पिछाडीवर, कारेगाव पाबळ जिल्हा परिषद गटात २६९३ मतांनी पिछाडीवर, कवठे टाकळी हाजी जिल्हा परिषद गटात २३३६ मतांनी पिछाडीवर, रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटात १९५ मतांनी पिछाडीवर राहिले. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम अमोंडी शिनोली जिल्हा परिषद गटात १८४ मतांनी पिछाडीवर, पेठ घोडेगाव जिल्हा परिषद गटात ३५८८ मतांनी पिछाडीवर, आणि मंचर अवसरी खुर्द जिल्हा परिषद गटात चार हजार २४० मतांनी पीछाडीवर राहिले आहेत. तर शिरूर तालुक्यातील ४२ गावातील तीनही जिल्हा परिषद गटात महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम आघाडीवर होते. अमोंडी – शिनोली जिल्हा परिषद गटात देवदत्त निकम आघाडीवर होते. तर घोडेगाव – पेठ जिल्हा परिषद गट, मंचर अवसरी खुर्द जिल्हा परिषद गटात महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील आघाडीवर राहिले. घटते मताधिक्य हा चिंतेचा विषय आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील शरद सहकारी बँक, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती, आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघ, आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया संस्था, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक पुणे जिल्हा दूध उत्पादक कात्रज संचालक तसेच गावोगावच्या ग्रामपंचायती, पतसंस्था, सोसायटी यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थात दिलीप वळसे पाटील यांचे जवळपास ९५ टक्के वर्चस्व आहे. तालुका पातळीवरील संचालकांची फौज, कार्यकर्त्यांची फौज आणि विविध गावातील शेकडो कार्यकर्ते असतानाही मोठी शक्तिस्थान असतानाही घटलेले मताधिक्य हा मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने चिंतेचा विषय झाला आहे. ……………