Pune District : जिल्हा परिषद आरक्षणाकडे लक्ष वेधले

शिक्रापूर झेडपी गटात उत्सुकता शिगेला
शिक्रापूर – जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झालेल्या असताना सध्या जिल्हा परिषद निवडणुकात मोठी घडामोड घडण्याची शक्यता निर्माण झाली असताना आरक्षण निश्चिती प्रक्रियेचा अंतिम टप्पा सुरु असून त्याचा थेट परिणाम स्थानिक राजकारणावर होणार असल्याने जिल्हा परिषद आरक्षणावर सर्वांची नजर लागली आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे गट व गण जाहीर झालेले असताना शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावाचे दोन गटात विभाजन होऊन गाव दोन गटात विभागले गेल्याने सर्व ग्रामस्थ व पदाधिकारी गट तट व पक्ष विसरुन एकत्र आले. आंदोलन करत विशेष ग्रामसभा घेऊन गाव एकत्र करुन एकसंघ ठेवून एकाच गटात ठेवण्याचा ठराव मंजूर केला.
या घडामोडीमुळे इच्छुक उमेदवार, राजकीय नेत्यांची झोप उडाली आहे. मुळात आरक्षण कोणत्या गटासाठी लागणार, कोणते मतदारसंघ राखीव होतील व कोणते खुले राहतील यावर राजकीय समीकरण ठरणार असल्याने अनेक ठिकाणी आरक्षणामुळे सध्या सक्रिय असलेल्या उमेदवारांना आपले क्षेत्र सोडावे लागण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मतदारसंघ फेरबदल आणि नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याचे संकेत आहेत. शासनाकडून आरक्षण प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याचे आश्वासन देण्यात आले असले तरी राजकीय आरोप- प्रत्यारोपांना उधाण आले असून काही ठिकाणी स्थानिक पातळीवर नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
मात्र, लवकरच अंतिम आरक्षण यादी जाहीर होऊन त्यानंतर निवडणुकीचा बिगुल अधिकच जोमात वाजणार हे निश्चित आहे. जिल्हा परिषद निवडणूक ही ग्रामीण भागातील सत्ता स्थापनेसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने आरक्षणाचा परिणाम पुढील पाच वर्षांच्या राजकारणावर होणार असल्याने जिल्हा परिषद आरक्षणावर उमेदवार, नेते, पदाधिकारी व मतदारांची नजर लागली आहे.





