Pune District : कोरेगाव भीमाच्या मिबा कंपनीत योग साधना

कोरेगाव भीमा – योग ही आपली परंपरा, संस्कृती, आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. ही चिकित्सा पद्धती आहे. भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी, स्वस्थ समाजाची निर्मिती व्हावी म्हणून कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील मिबा कंपनीमध्ये योग दिन साजरा करण्यात आला.
यावेळी प्रशिक्षक जयश्री भगत यांनी सर्वांकडून योगाभ्यास करवून घेतला. ताडासन, भुजंगासन, अर्धशलभासन, मकरासन, कपालभाती, अनुलोम विनोम आदी आसने व प्राणायाम करण्यात आली. यावेळी मिबा कंपनीचे एमडी सतीश बरवे यांसह अधिकारी व कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशिक्षक जयश्री भगत म्हणाल्या की, एक पृथ्वी एक आरोग्य या संकल्पनेवर आधारित जागतिक योग दिन संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. योगसाधना कोणालाही करता येते. शरीर, मनाला आणि शरीरातील सर्व चक्रांना पुनुरुज्जीवित करीत उभारी देण्याचे काम योगासनाच्या माध्यमातून होते.
ही सर्व आसने शरीराची रचना लक्षात घेऊन रचलेली आहेत. नखापासून केसापर्यंत शरीराच्या प्रत्येक बाह्य आणि अंतर्गत अवयवाला दिशा देण्याची आणि उपचार करण्याची रचना योगासनात आहे. जगामध्ये योगासनाकडे उपचार शक्ती (हिलींग पॉवर), आरोग्यदायी जीवनशैली (वेलनेस) म्हणून पाहिले जात आहे.





