Pune District : वाजेवाडीतील कला केंद्राला महिलांचा विरोध

महिलांचा ठिय्या ः ग्रामपंचायतीत अर्ज नामंजूर
शिक्रापूर – शिरूर तालुक्यातील वाजेवाडी गावात नव्याने सुरू होऊ घातलेल्या सांस्कृतिक कला केंद्राला स्थानिक महिलांचा कडाडून विरोध झाला आहे. ग्रामपंचायत सभेत महिलांनी आक्रमक पवित्रा घेत ठिय्या मांडला आणि परवानगी अर्ज नामंजूर करण्याचा ठराव सर्वानुमते करण्यात आला.
वाजेवाडी येथील एका स्थानिक इसामची जागा अहिल्यानगर जिल्ह्यातील एका महिलेने भाडेतत्त्वावर घेत कला केंद्र सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मागितले होते. त्यानुसार ग्रामपंचायत सभागृहात विशेष महिला सभा आयोजित करण्यात आली.
सभेत अर्जाचे वाचन होताच महिलांनी विरोधाचा झंझावात उभा केला. त्या आक्रमक होत ग्रामपंचायत कार्यालयातच ठिय्या मांडून बसल्या. अखेर महिलांच्या एकजुटीपुढे ग्रामपंचायतीने अर्ज नामंजूर करत कला केंद्राला परवानगी नाकारली.
वाजेवाडी गावच्या हद्दीतील कलाकेंद्रासाठी आलेला परवानगी अर्ज महिलांच्या सभेत सर्वानुमते नामंजूर करण्यात आला असून, ग्रामसभा गुरुवारी होणार आहे.
-मंगल लगड, ग्रामपंचायत अधिकारी





