Pune District : डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; वाघोली बाईफरोड येथील घटना

वाघोली : डंपरने धडक दिल्यानंतर दुचाकीवरील महिला डंपरच्या चाकाखाली सापडून महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वाघोली येथील बाईफ रोड परिसरात आयडीबीआय बँकेच्या जवळ बुधवारी (दि.३०) सायंकाळी ६ च्या सुमारास घडली. पती, लहान मुल व महिला दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात महिलेला डंपरने मेडिकल पासून मुळीक लक्झुरीया सोसायटीच्या सीमाभिंती पर्यंत फरफटत नेल्याने अपघाताचे दृश्य पाहून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
रुपाली सुरज तिवारी (वय ३५, रा. बाईफ रोड) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव समजते. अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. घटना घडल्यानंतर वाघोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणत डंपर व मृतदेह हलविला. याप्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. अधिक तपास वाघोली पोलीस करीत आहेत.
डंपरच्या अपघातानंतर बाईफ रोड तसेच वाघोलीतील नागरिकांनी ठराविक वेळेत डंपरच्या वाहतुकीवर निर्बंध असताना डंपर रस्त्यावर दिसत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला आहे. डंपर चालकाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.





