पुणे जिल्हा : दूध दरात केलेली कपात तात्काळ मागे घ्या

शेतकरी संघटनेचा खासगी दूध संघांना आंदोलनाचा इशारा
बेल्हे – खासगी दूध संघांनी दूध दरामध्ये तीन रुपयांनी कपात केली तात्काळ मागे घ्या. दूध उत्पादकांना प्रति लिटर पन्नास रुपये दर द्या, नाहीतर जुन्नर तालुक्यात मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा अखिल भारतीय शेतकरी संघटना पुणे अध्यक्ष प्रमोद खांडगे पाटील यांनी दिला आहे.
गोकुळ दूध संघ, वारणा दूध संघासह खासगी दूध संघांनी दूध खरेदी दरामध्ये तीन रुपयांची कपात केल्याने शेतकर्यांचा प्रचंड रोष वाढला आहे.भविष्यकाळामध्ये अखिल भारतीय शेतकरी संघटना दूध उत्पादक गवळ्यांना घेऊन दूध संघ विरुद्ध व शासनाविरुद्ध रस्त्यावर उतरून तीव्र संताप व्यक्त केला जाईल.
जुन्नर तालुक्यातील छोट्या मोठ्या दूध डेर्यांमध्ये दूध उत्पादक शेतकर्यांना 25 ते 28रुपये प्रति लिटर दर मिळत असल्यामुळे दूध गवळी सांगत आहेत. दहा गायी सांभाळण्यासाठी दोन मजूर लागत आहे. महिलेला तीनशे रुपये रोज तर पुरुषाला पाचशे रुपये हजेरी द्यावी लागते रतीब चारा औषधोपचार खर्च धरता प्रति लिटर उत्पादन खर्च 25 रुपये येत असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होणार आहे.
अनेक शेतकर्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणतात की, त्यांना आपल्या मेहनतीचे योग्य मूल्य मिळत नाही आणि हे दर कमी करणे त्यांच्या परिश्रमांचे मूल्य कमी करणारे आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील गोकुळ, वारणा, राजारामबापू या सहकारी संघासह पश्चिम महाराष्ट्रातील खासगी दूध संघांनी सुद्धा गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची कपात केली आहे. 3. 5 फॅट व 8. 5 एसएनएफ दूध 30 रुपये लिटरने खरेदी केलं जाईल, असे सांगितले जाते; मात्र प्रत्यक्षात दूध गवळ्यांना 25 ते 27 रुपये दर प्रति लिटर मिळत आहे. तर थेट तीन रुपयांना कात्री लावल्याने दूध उत्पादक शेतकर्यांना तगडा झटका बसला आहे.
दूध पावडर, लोणी, दुधाचे बाजारातील विक्रीचे दर आणि खरेदी दर यामध्ये तफावत राहत आहे. दुध दरामध्ये तीन रुपये कपात केली आहे. ती तात्काळ मागे घ्यावी. अन्यथा पुढील काही दिवसांमध्ये दूध उत्पादक गवळ्यांना घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल. असा इशारा अखिल भारतीय शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नवनाथ भांबेरे, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष वर्षाताई गुंजाळ, युवा अध्यक्ष राहुल जेजुरकर, शेतकरी प्रतिनिधी अनिलदादा गावडे, कार्याध्यक्ष प्रवीण डोंगरे, विभागीय अध्यक्ष विक्रम सोलाट पाटील यांनी दिला आहे.
एक गायीसाठी पशुखाद्य चार किलो कमीत कमी द्यावे लागते त्याला खर्च 60 रुपये येतो चारापाण्यासाठी सरासरी 120 ते 150 रुपये एवढा खर्च येतो. औषधोपचार खर्च, मजूर खर्च, लाईट बिल खर्च हे सर्व खर्च धरले तर 400 रुपये दररोज एका गायीला खर्च येतो. साधारणपणे एक गाई 12 ते 15 लिटर दूध देते. जुन्नर तालुक्यामध्ये दूध उत्पादकांना 25 ते 27 रुपये लिटरला भाव मिळतो. 27 भावाप्रमाणे शेतकर्याला एका गायीचे उत्पन्न दररोजचे चारशे रुपये मिळते. त्यामुळे शिल्लक काहीच राहत नाही. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चाच्या 50 टक्के नफा ह्या सूत्रानुसार गाईच्या दुधाला 50 रुपये व म्हशीच्या दुधाला 75 रुपये भाव मिळाला तरच, दूध उत्पादक शेतकरी टिकेल नाही तर, महाराष्ट्रात दूध उत्पादक शेतकर्यांच्या आत्महत्या वाढतील.
-प्रमोद खांडगे पाटील, अध्यक्ष पुणे अखिल भारतीय शेतकरी संघटना
माझ्याकडे दुभत्या दहा गायींचा गोठा आहे. खुराकासाठी सरकी पेंड, हरभरा चुनी, गहू भुस्सा यासाठी तीस हजार रुपये महिन्याला लागतात. गिन्नी गवत, वैरण, ऊस, वाडे, कडब्यासाठी महिन्याला वीस हजार. चारा बारीक करण्यासाठी कुट्टी मशीनची आवश्यकता असते. त्यासाठी लाईट बिल व गोठ्यातील बिल यासाठी पाच हजार रुपये खर्च येतो. गोठा व्यवस्था पाहण्यासाठी एक जोडपे आहे. महिलेला नऊ हजार रुपये तर पुरुषाला पंधरा हजार रुपये महिन्याला पगार द्यावा लागतो. सर्व उत्पादन खर्च 80 हजार रुपये महिन्याला येतो. दररोज 90 ते 100 लिटर दूध डेअरीला जाते. महिन्याकाठी 3000 लिटर दूध डेअरीला जाते. सध्या 27 रुपये प्रति लिटर दर मिळतो. 80 ते 85 हजार रुपये एवढा पगार महिन्यासाठी येतो; परंतु उत्पादन खर्च वजा जाता. शेणा शिवाय काही शिल्लक राहत नाही.
-विक्रम सोलाट पाटील, दूध उत्पादक शेतकरी गुंजाळवाडी





