Pune District : पिके जळून गेल्यावर पाणी सोडणार का?

कळस : येथील शेतकर्यांना जाणीवपूर्वक खडकवासला कालव्याच्या पाण्यापासून डावलण्यात आल्याने परिसरातील पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत असा आरोप कळस (ता. इंदापूर) येथील शेतकर्यांनी खडकवासला पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता पंकज हुलसुरे यांच्याकडे केला. सध्याची पाण्याची गरज ओळखून तातडीने इंदापूरसाठी आवर्तन सुरु करण्याची आग्रही मागणी यावेळी उपस्थितांनी केली.
येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात आज (रविवारी) सकाळी अभियंता पंकज हुलसुरे, शाखा अभियंता शामराव भोसले यांनी ग्रामस्थ शेतकर्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. यावेळी उपस्थित शेतकर्यांनी खडकवासला कालवा व वितरीकांच्या आवर्तनाबाबत तक्रारींचा उपस्थित अधिकार्यांसमोर पाढाच वाचला. येथील मुख्य कालवा, त्यावरील 48, 49 व 50 क्रमांकाच्या वितरिकेतून पाणी सोडण्यात होणारा दुजाभाव, वितरिकांची दुरवस्था पिके जळून गेल्यावर पाणी सोडणार का, यांसह अन्य काही समस्या उपस्थित अधिकार्यांच्या कानावर घातल्या.
एकीकडे इंदापूर तालुक्याची शीव ओलांडल्यावर शेतकर्यांना पाणी घेण्यावर निर्बंध घातले जातात. तर दुसरीकडे बारामती, दौंड, हवेली तालुक्यात इंदापूरला पाणी पोचण्याअगोदर बेसुमार पाणी उपसा कसा सुरु असतो? या प्रश्नावर अधिकारी निरुत्तर झाले. एकंदरीत इंदापूर तालुक्यातील शेतकर्यांना खडकवासला कालव्याच्या पाण्यापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात असल्याचा थेट आरोप उपस्थितांनी केला. यावर तातडीने सुधारणा न झाल्यास सिंचन भवन येथे सामुदायिक आत्मदहन करण्याचा तोंडी इशारा शेतकर्यांनी दिला.
यावेळी इंदापूर तालुक्याचा सिंचन कालावधी कमी करण्यात आल्याने, पाणी मिळण्यात अडचणी येत आहेत. वितरिकांच्या दुरुस्तीसाठी 52 कोटी रुपये खर्चाची दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. यानंतर वितरण व्यवस्था सुधारण्यास मदत होईल असे स्पष्टीकरण उपस्थित अधिकार्यांनी दिले.
परिसरातील ओढे, नाले आठले असुन विहिरी, बोरवेलने तळ गाठल्याने शेतीच्या पाण्याच्या प्रश्ना बरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. त्याच बरोबर फिरत्या जनावरांचा देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे खडकवासला कालव्याद्वारे तातडीने उन्हाळी अवर्तन सोडण्याची मागणी येथील शेतकर्यांनी केली आहे.
या प्रश्नांचे उत्तर हवे
इंदापूरकरांच्या वाटणीचे पाणी कमी का झाले? असा सवाल उपस्थितांनी केला. आवर्तन काळात शेतकर्यांची वीज बंद केली जाते. कालव्यात आलेले पाणी उपसण्यावर निर्बंध घातले जातात. शेतकर्यांच्या पाईप फोडल्या जातात. वितरिकांना केवळ दाखविण्यापुरते तास-दोन तास पाणी सोडले जाते. यासाठी खासगी यंत्रणेची मदत घेतली जाते. त्याचा त्रास शेतकर्यांना होतो. वितरिकांना पाणी येत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. यांसारख्या अनेक समस्या उपस्थित शेतकर्यांनी यावेळी मांडत यावर अधिकार्यांकडून स्पष्टीकरण मागितले.
तलावात पाणी सोडण्यास टाळाटाळ
कळस गावाला पाणी पुरवठा करणार्या विहीरी असलेल्या गावालगतच्या तलावात पाणी सोडण्याबाबत प्रत्येक आवर्तनाला ग्रामपंचायतीकडून पाटबंधारे विभागाला पत्रव्यवहार केला जातो; मात्र यावेळी या तलावात पाणी सोडण्याचे टाळण्यात आले. यानंतर क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन ग्रामस्थांनी कैफियत मांडली. यावेळी मंत्री भरणे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे तलाव भरण्याची सूचना करत वितरिकांना तीन दिवस आवर्तन देण्याची सूचना केली; मात्र मंत्र्यांच्या सूचनेनंतरही तलाव भरण्याचे टाळत वितरिकेला दोन तास पाणी सोडण्यात आल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. मंत्र्यांचे अधिकारी ऐकत नसतील तर मग लोकांनी नेमकी तक्रार कोठे करायची, असा सवाल यावेळी उपस्थित शेतकर्यांनी केला.





