पुणे जिल्हा : वीर येथे पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणार

जनसंवाद यात्रेनिमित्त कोपरा सभेत संभाजीराव झेंडेंचे आश्वासन
सासवड – श्रीक्षेत्र वीर (ता पुरंदर) येथील पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करू व त्यानिमित्ताने युवकांना रोजगार उपलब्ध होतील. तसेच गायरान धारकांचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित असून सर्वसामान्य गोरगरिबांची राहती घर कोणीही काढू शकत नाही. विधानसभेत पोहोचल्यानंतर निवासी घरे नावावर करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे, असे आश्वासन पुरंदर-हवेलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संभाजीराव झेंडे यांनी दिले.
वीर येथे जनसंवाद यात्रेनिमित्त आयोजित कोपरा सभेमध्ये झेंडे बोलत होते. संभाजीराव झेंडे यांच्या प्रचारार्थ नवलेवाडी, राऊतवाडी, हरणी, वीर, तोंडल, मांडकी, जेऊर, पिसुरटे, गुळूंचे, नीरा, पिंपळे खुर्द, वाल्हे, पिंगोरी, दौंडज असे जनसंपर्क दौर्याचे आयोजन केले होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, राष्ट्रवादीचे राजू धुमाळ, अनिरुद्ध धुमाळ, सागर धुमाळ, आकाश धुमाळ, ऋतुजा धुमाळ, बिपीन शिंदे, राहुल कापरे, वैभव वचकल, महेश धुमाळ, रामा धुमाळ, विकास हेंद्रे, मनेष कुंभार आदी उपस्थित होते.
संबाजीराव झेंडे म्हणाले की, गेली 15 वर्षे आजी-माजी लोकप्रतिनिधींकडून गुंजवणीच्या पाण्यावर राजकारण सुरू आहे. हे अत्यंत दुर्दैवी आणि खेदजनक आहे. जनता जनार्दन हुशार आहे ते सर्व काही ओळखून आहे. तसेच खालच्या पातळीचे राजकारण करणे माझ्या बुद्धीला पटत नाही, त्यामुळे त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ असो, असे त्यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बळ देण्यासाठी एक एक जागा महत्त्वाची आहे त्यामुळे पुरंदर-हवेलीचे आमदार म्हणून संभाजीराव झेंडे यांना विधानसभेत पाठवायचे आहे. आपल्या विचाराचा आमदार विधानसभेत गेल्यानंतर या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणार आहे.
– प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, जिल्हा बँक





