आमदार बेनके यांचे जुन्नरवासीयांना आश्वासन ओतूर – स्व. वल्लभ बेनकेंनी शेवटच्या श्वासापर्यंत जुन्नरकरांची सेवा केली तशीच आज मी माझ्या आई देखत सांगत आहे की तुझा मुलगा शेवटच्या श्वासापर्यंत जुन्नरकरांची सेवा केल्याशिवाय राहणार नाही असे अश्वासन जुन्नर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी दिले. ओतूर येथे राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रचार सभेत आमदार बेनके बोलत होते. तालुक्याचे संस्कार आणि संस्कृती जपायची असेल तर मी देव, देश, धर्म पंथाची आयुष्यभर सेवा करेल. गेली पाच वर्षे आपल्या विश्वासाला पात्र राहून जाती धर्म पंथ भेदभाव न करता जुन्नरकरांची प्रामाणिकपणे सेवा केली. जुन्नर तालुक्याला महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असे बेनके यांनी म्हटले. आमदार बेनके म्हणाले की, पाणी मिळाले पाहिजे याबद्दल दुमत नाही पाणी मिळाले पाहिजे याबद्दल दुमत नाही. परंतु डिंभे ते माणिकडोह बोगदा वरच्या पातळीवर झाला पाहिजे. तो जर तळाला केला तर त्याची लेव्हल माणिक डोह धरणापर्यंत येत नाही. त्यामुळे पाणी कुकडी नदी मध्ये सोडावे लागेल. वरच्या पातळीवर झाला तर डिंभे धरणातून पाणी माणिकडोहला येईल. खालच्या तळाला झाला तर डायरेक्ट पाणी कुकडी नदीला सोडावे लागेल. त्यामुळे डावा कालवा बंद होईल. खालच्या पातळीवर बोगदा झाला तर दोन महिन्यात डिंभे धरण रिकामे होईल, असे त्यांनी नमूद केले. दिशादर्शक पर्यटनाचा आराखडा तालुक्याला दिशा देण्यासाठी अजित पवारांच्या मदतीने पर्यटनाचा चार सर्किटमध्ये जुन्नरच्या पर्यटनाचा आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये ऐतिहासिक, आध्यात्मिक , नैसर्गिक, साहसी पर्यटनाचा समावेश आहे. शिवनेरी ते लेण्याद्री रोपवेने प्रवास करण्यासाठी आराखडा तयार करीत आहोत. भविष्यात अपंगांसाठी निराधार आश्रम निर्माण करायचा आहे.