Pune District : जिवंत असेपर्यंत सहकारी राहणार ; अजित पवार यांची ग्वाही

विरोधकांच्या आरोपाचे खंडन
माळेगाव – आजपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवला. आत्ताही ठेवा. जोपर्यत मी जिवंत आहे. तोपर्यंत माळेगाव कारखाना सहकारीच राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्वाही दिली. माळेगाव सहकारी साखर कारखानाच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील मळद, नीरावागज, गुणवडी, डोर्लेवाडी या भागात सभेत त्यांनी विरोधकांच्या आरोपांचे खंडन करत टीकास्त्र सोडले.
पवार म्हणाले, त्यांनी काय मुद्दा काढला? जिल्हा बँकेला वेळ देता येत नाही म्हणून राजीनामा दिला. त्या ठिकाणी रणजीत तावरे यांना घेतले. पण एक लक्षात घ्या मी आता संचालक होण्यासाठी नाही तर मी माळेगाव कारखान्यात चेअरमन होण्यासाठी जात आहे. आता बोर्ड मीटिंग माझ्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यामुळे मला कारखाना चालवायचा माहिती आहे.
त्याची विरोधकांनी काळजी करण्याची गरज नाही. कारखाना असा चालवून दाखवेल की, राज्यात त्याचा नावलौकिक असेल. बारामतीसारखा माळेगावचा आणि शिवनगरचा विकास करणार आहे. या विकासासाठी माळेगाव कारखान्याचा एकही रुपया खर्च करणार नाही. जोपर्यंत अजित पवार जिवंत आहे, तोपर्यंत माळेगाव कारखाना सहकारी होता आणि सहकारीच राहणार, अशी ग्वाही पवार यांनी दिली.
आजपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवला आहे. आताही विश्वास ठेवा. विरोधक काहीही दिशाभूल करतात. माझ्याकडे 14 कारखाने आहेत, अशी दिशाभूल विरोधक करत आहेत. जर माझ्याकडे एक तेवढे कारखाने आहेत तर दहा कारखाने तुमच्याकडे देतो. चार कारखानेच फक्त माझ्याकडे ठेवतो. ते काहीही बोलतात. आज ते म्हणतात, कारखाना बंद पडणार आणि खाजगी करणार! पण लक्षात घ्या, जोपर्यंत अजित पवार जिवंत आहे, तोपर्यंत माळेगाव कारखाना सहकारी होता आणि सहकारीच राहणार असे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी सभासदांना दिले.





