Pune District : रेल्वे मार्ग बदल्यास लढा उभा करणार

नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील जीएमआरटीमुळे शेतकर्यांच्या विकासाची जीवनदायीनी असलेल्या रेल्वे मार्गात बदल करणार असाल तर आपल्याला मोठा लढा उभा करून संघर्ष करावा लागेल असे शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. नारायणगाव येथील ग्लोबल कृषी महोत्सवाच्या समारोपा प्रसंगी डॉ. कोल्हे बोलत होते. ते म्हणाले की, जीएमआरटी जुन्नर तालुक्यात 30 वर्षांपूर्वी (1996मध्ये) आली असून मागील तीस वर्षांत शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान आले तर जीएमआरटीमध्ये काही तंत्रज्ञान बदलले की नाही असा प्रश्न निर्माण होतो.
शेतमालासाठी कृषी विज्ञान केंद्र शेतकर्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील आहे. मग शेतकर्यांनी पिकवलेल्या उत्पादित मालाचे करायचे काय? आम्हाला बाजारपेठ निर्माण होण्यासाठी वाहतुकीचे मार्ग उपलब्ध झाले पाहिजे.शेतकर्यांनी पिकवलेल्या शेतमालाला 60 टक्के वाहतूक खर्च होत असेल तर शेतकर्याच्या पदरात पडते काय. शेतमालाच्या जलवाहतूक मार्गासाठी एक टक्के, रेल्वे मार्गासाठी तीन टक्के तर रस्ते मार्गासाठी नऊ टक्के खर्च येतो. पुणे नाशिक रेल्वे मार्ग निर्माण झाला तर शेतकर्याच्या खर्चात बचत होऊन उत्पादन वाढेल आणि उत्तर व दक्षिण भारतातील बाजारपेठ उपलब्ध होईल. तंत्रज्ञानाच्या क्रांतीची फळे पुढच्या पिढीला मिळविण्यासाठी आपण लढा उभा केला नाही तर हाता तोंडाशी आलेला घास निष्ठून जाईल याची प्रत्येकाने जाणीव ठेवली पाहिजे.
यामध्ये कुठलाही स्वार्थ नसून पुणे-नाशिक ब्रॉडगेज रेल्वे मार्ग आहे. त्यामुळे पुणे नाशिक रेल्वे मार्ग नुसता प्रवासी वाहतुकीसाठी नसून रात्री अकरानंतर मोठ्या प्रमाणात मालवाहतुकीसह इतर वाहतूक होणार आहे. त्याचा फायदा शेतकर्यांनी पिकवलेला शेतमालाला देशाभरातील बाजारपेठा उपलब्ध होणार अल्याचे त्यांनी नमूद केले.
जीएमआरटी, रेल्वे राहिली पाहिजेच
जीएमआरटी अभिमानास्पद असली तरी शास्त्रज्ञाने तोडगा काढून जीएमआरटी व रेल्वे राहिली पाहिजे, असा प्रयत्न केला पाहिजे. रेल्वेच्या मूळ डीपीआरमध्ये मी जाणीवपूर्वक भांडून आळेफाटा, नारायणगाव, मंचर येथे अॅग्रीकल्चर रॅक मागून घेतल्या होत्या. आमच्याच तालुक्याच्या आवारात तुम्ही आहात. आणि तुमच्यामुळे आमच्या विकासाच्या संधी खुंटत असतील तर आम्हाला प्रश्न विचारावे लागतील. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून विज्ञान आणि तंत्रज्ञान शेतकर्यांच्या घरापर्यंत पोहोचत असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.
जीएमआरटी इम्पोर्टसाठी काही सुविधा देणार का?
जीएमआरटीच्या माध्यमातून 23 देशाचे शास्त्रज्ञ देशांचा अभ्यास करतात त्यामुळे पुणे-नाशिक रेल्वे मार्ग बदलावा लागेल, असे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते. यावर डॉ. कोल्हे म्हणाले की, जर रेल्वे मार्ग बदलला तर कृषी क्षेत्रातील तज्ञांनी सांगावे की आमचा शेतमाल उत्तर व दक्षिण भारताच्या बाजारपेठेत पोहोचण्यासाठी 23 देशांतील शास्त्रज्ञ जीएमआरटीच्या माध्यमातून शेतमालाच्या इम्पोर्टसाठी काही सुविधा देणार आहेत का? शेतकर्यांच्या विकासासाठी काही योजना आणली आहे का?





