Pune District : आठ लाख स्क्वेअर फुटाचा निवारा देणार

नीरा : यावर्षीच्या पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास विभागाकडून ६० कोटींची तरतूद केली आहे. पावसाचे प्रमाण अधिकचे असल्याने पालखी मार्गावर ठिकठिकाणी निवारा शेड उभारले जातील. या वारे सोहळा दरम्यान साधारण सात ते आठ लाख स्क्वेअर फुटाचे निवारे उभारले जातील, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. नीरा पालखी तळाच्या कॉंक्रिटीकरणासाठी ५० लाख रुपयांचा निधी तात्काळ देत असून तातडीने हे काम पूर्ण करण्याच्या सूचना पुणे जिल्हा परिषदेला दिल्याचे ग्रामविकास मंत्री जयकूमार गोरे यांनी सांगितले.
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा (दि.१९) पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे. या सोहळ्याची प्रशासनाच्या वतीने तयारी अंतिम टप्प्यात आहे. याची पाहणी मंत्री गोरे यांनी केली. पुणे जिल्ह्यातील नीरा येथील विसावा स्थळाला भेट दिली असता ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सीईओ गजानन पाटील, अतिरिक्त सीईओ चंद्रकांत वाघमारे, प्रांताधिकारी वर्षा लांडगे, डीवायएसपी तानाजी बरडे, तहसीलदार विक्रम राजपूत, जेजुरीचे सहायक पोलीस निरीख दीपक वाकचौरे, नीरेचे उपसरपंच राजेश काकडे, माजी बांधकाम सभापती दत्ता चव्हाण, बाळासाहेब भोसले, योगेंद्र माने, प्रमोद काकडे, उमेश चव्हाण, दीपक काकडे, साताराचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, एस. पी. तुषार दोशी, सीईओ याशनी नागराजन, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, फलटणचे डीवायएसपी राहुल धस, लोणंदचे सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले आदी उपस्थित होते.
मंत्री गोरे म्हणाले, मागील वर्षी ज्या अडचणी आल्या, त्याचा अभ्यास करून यावर्षीच्या सोहळ्याची सर्व तयारी केली आहे. त्यानुसार जर्मन अँगल वापरून यावर्षी आम्ही सात ते आठ लाख स्क्वेअर फुटाची निवारा व्यवस्था निर्माण करीत आहे. फलटण तालुक्यातील तरडगावचा पालखीतळ पाण्यात गेला आहे, तो दुरुस्त करण्यासाठी दीड कोटी खर्च येणार आहे. दहा दिवसांत ते काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
नीरा या ठिकाणचा विसावा काँक्रीट करण्यासाठी ५० लाखांची तरतूद केली आहे. ते काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी मुख्य अधिकारी गजानन पाटील यांना दिल्या आहेत.
ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून ६० कोटी
पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यासाठी पालखी करता भरीव निधीची तरतूद केली आहे. ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून ६० कोटी रुपये तरतूद केलेली आहे. आधीकचा निधी लागला तर अडचण नाही. सातारा, पुणे, सोलापूर जिल्हा नियोजन मंडळातून व्यवस्था करत आहोत. लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना सरकारकडून करण्यात आले आहेत.
स्वागत कमानी व स्टेज नकोच
काही ठिकाणी लोक स्वागत कमानी उभ्या करतात. त्या ठिकाणी स्टेज घालून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. डीजे लावतात, त्याचा कर्कश आवाज येतो, या संदर्भात आळंदी पालखी विश्वस्तांकडून सूचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही केली आहे. आवाजात भोंगे लावण्यास परवानगी दिली जाणार नाही.





