Pune District : माळेगावात आज बाजी कोण मारणार

बारामतीत मतमोजणी : अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला
बारामती – माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल लागण्याची प्रतीक्षा शिगेला पोहोचली आहे. रविवार (दि.२२) पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्त मतदान झाल्याने आज कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘अण्णा- काकांचे सहकार बचाव पॅनल विजय मिळवणार का ? की दादांचे वर्चस्व अबाधित राहणार ?’ अशी चर्चा सध्या चौका-चौकात रंगली आहे. मतदानाच्या दिवशी शेतकऱ्यांपासून स्थानिक कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनात उत्सुकता होती. यंदाची निवडणूक वेगळी ठरली आहे. प्रशासकीय यंत्रणांचा अतिरेकी हस्तक्षेप, पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर, मतदानाच्या वेळेस झालेली प्रत्यक्ष स्थिती यामुळे निवडणूक प्रामाणिक राहिली का?, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, एका मताला चक्क १५ ते २५ हजार रुपयांपर्यंत किंमत असल्याच्या चर्चाचा जोर चढला आहे. त्यामुळे ‘असा विजय कितपत खरा ?’ हा सवाल विचारला जात आहे.
दुसरीकडे, ‘आमदार तुम्हीच, खासदार तुम्हीच आणि कारखान्यावर पण तुम्हीच, मग कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का?’ अशा स्वरूपाचा नाराजीचा सूरही कार्यकर्त्यांतून उमटताना दिसतो आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी सहकार बचाव पॅनलला मत दिले, असा दावा अण्णा काका समर्थक करत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी नातेवाईक संबंध, अडचणी आणि प्रशाकीय दबावतंत्र वापरून सभासदांना गोंजारल्याच्या तक्रारी देखील समोर येत आहेत.
त्यातच मतदान प्रक्रियेच्या वेळेस झालेल्या विलंबामुळे मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग झाल्याचीही जोरदार चर्चा आहे. असो मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मतदार राजाने कल कळू दिला नाही मात्र ज्या ठिकाणी मतदार जास्त मतदान प्रक्रिया करीत होता किंवा जास्त वेळ घेत होता त्या-त्या केंद्रांवर क्रॉस वोटिंग झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकूणच त्याच ठिकाणचे वातावरण संशयाच्या भोवऱ्यात आहे. तर निकाल काय लागतो यावरून फक्त विजयी पॅनल ठरणार नाही. शेतकरी वर्गाने अनुभवाला महत्त्व दिलं की दबावतंत्राला याचाही निर्णयही येणाऱ्या काही तासात लागणार आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. २२) सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान मतदान होत आहे. यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून, एकूण ६७ मतदान केंद्र निश्चित केली आहेत.प्रशासनाची पूर्ण तयारी झाली असून पोलिस यंत्रणेचा चोख बंदोबस्त राहणार आहे.
माळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये एकूण चार पॅनेल तसेच अपक्ष उमेदवारांसह एकूण ९० उमेदवार आपले नशीबआजमावणार आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री नीलकंठेश्वर पॅनेल, चंद्रराव तावरे व रंजन तावरे या गुरू-शिष्यांचा सहकार बचाव शेतकरी पॅनेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा बळीराजा सहकार बचाव पॅनेल आणि कष्टकरी शेतकरी समितीचा पॅनेल व इतर अपक्ष, अशी लढत असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, ‘ब’ वर्ग गटातून स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उमेदवारी आहे.
या निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, ६७मतदान केंद्र निश्चित केले आहेत. यामध्ये गट नंबर १ माळेगावसाठी ११ मतदान केंद्र, गट नंबर २ पणदरेसाठी १३ मतदान केंद्र, गट नंबर ३ सांगवी-कांबळेश्वरसाठी ८ मतदान केंद्र, गट नंबर ४ खांडज शिरवलीसाठी ७ मतदान केंद्र, गट नंबर ५ निरावागजसाठी १२ मतदान केंद्र, गट नंबर ६ बारामतीसाठी १५ मतदान केंद्र निश्चित केली आहेत. ‘ब’ वर्गसाठी १, अशा एकूण ६७मतदान केंद्रांवर मतदान करण्याता येईल. दरम्यान, पोलिस प्रशासनाने देखील कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेण्यासाठी संपूर्ण तयारी केल्याचे सांगण्यात आले.





