Pune District : कोण होणार सभापती, उपसभापती ?

नीरा : नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया आता जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिसूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण यांच्यावतीने काढण्यात आली आहे. यानुसार मंगळवारी (दि. 25) सासवड येथील उपबाजारामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहे. त्यामुळे आता नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती आणि उपसभापती कोण होणार, याकडे पुरंदर आणि बारामती येथील शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संचालक मंडळ आहे. संचालक मंडळाची निवड ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार शरद पवार एकत्र असताना झाली होती. यावेळी काँग्रेसचे आठ उमेदवार निवडून आले होते तर राष्ट्रवादीचे 10 उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे अजित पवारांच्या नेतृत्वाखालील संचालक शरद जगताप यांना सभापती करण्यात आले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कार्यकाळ वाटून घेण्यात आला होता.
त्यामुळे सध्या तरी काँग्रेसचा सभापती होईल असे म्हटले जात आहे. खरी स्पर्धा आहे ती उपसभापतिपदासाठी आहे. नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या महाविकास आघाडीचे प्राबल्य आहे. राष्ट्रवादीच्या फुटी नंतर अजित पवार यांच्याकडे सहा बाजार समितीचे संचालक आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे चार संचालक आहेत तर संजय जगताप यांच्याकडे आठ संचालक आहेत. एकंदरीत पाहता महाविकास आघाडीकडे एकूण 12 संचालक आहेत आणि त्यामुळे बाजार समितीच्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे पारडे जड आहे.
अजित पवारांविरोधात नाराजी?
विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी ऐनवेळी संभाजी झेंडे यांना उमेदवारी देऊन संजय जगताप यांच्या विजयामध्ये अडचण निर्माण केली. अजित पवार यांनी संजय जगताप यांच्या विजयचा रथ दिवे घाटाच्या खालीच अडवला. त्यामुळे आता या सभापतिपदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून अजित पवार गटाला महत्त्व दिले जाईल का? हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे. काँग्रेसमधून अजित पवार यांच्या विरोधात नाराजी असल्याचे पाहायला मिळते आहे. जर काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले तर अजित पवार यांचा उपसभापती होऊ शकणार नाही. त्यामुळे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. मात्र, असे असले तरी संजय जगताप अजित पवारांना वाकड्यात चालणार नाहीत, असे देखील काही संचालकांकडून बोलले जात आहे.
यांची नावे आहेत चर्चेत?
या वेळच्या सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये हे सभापतिपद हे काँग्रेसकडे असणार हे निश्चित आहे. त्यामुळे काँग्रेसमधून सभापतिपदासाठी संदीप फडतरे, देविदास कामथे, अशोक निगडे यांची नावे पुढे येत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून बाळासाहेब शिंदे, शरयू वाबळे यांची नावे आघाडीवर आहेत. शरद पवार गटाकडून देखील गणेश फुले यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उपसभापतिपदाच्या निवडीत चुरस निर्माण झाली आहे.
फोटो : नीरा बाजार समिती





