पुणे जिल्हा : इंदापूर तालुक्याला भाजला नवा चेहरा कोण ?

पळसदेव – नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. गेल्या तीन विधानसभा निवडणुकात भाजपची विजयाची घौडदौड सुरु आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 132 जागा मिळाल्या. मागच्या 2014 च्या निवडणुकीत 122 व 2019 ला 105 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे भाजपच्या महत्वकांक्षा वाढल्या आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक प्रचार दरम्यान गृह मंत्री अमित शहा यांनी आगामी 2029 च्या विधानसभा निवणुकीत एकट्या भाजपचे सरकारनं आणण्याचा निर्धार केला आहे.
भाजपच्या या निर्धारानुसार आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 288 मतदारसंघात आपले उमेदवार देईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात इंदापूर तालुक्यातून भाजपचा उमेदवार कोण असेल याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी 2019च्या निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यामुळे तालुक्यात भाजपकडे एक तगडा उमेदवार होता; आता मात्र हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम केला असल्यामुळे इंदापूर तालुक्यात भाजपासाठी एका तगड्या उमेदवाराचं आवश्यकता आहे.
लोकसभा निडणुकीवेळी आमदार दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील व प्रवीण माने यांनी लोकसभा उमेदवाराचा एकत्र प्रचार केला होता. यामध्ये हर्षवर्धन पाटील त्यावेळी भाजपमध्ये होते सध्या मात्र त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे तालुक्यातील भाजपची धुरा सांभाळण्यासाठी पुन्हा एकदा वजनदार नेत्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणूक पराभवानंतर पुन्हा पाटील यांची भाजप वापसी होण्याची शक्यता नाही; मात्र या वेळी प्रथमच विधानसभेची निवडणूक लढवले प्रवीण माने यांना मात्र तालुक्यातून भाजपशी सलगी केल्यास आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकात चित्र बदलू शकते.
कार्यकर्त्यांना विचारून निर्णय – माने
सध्याच्या निवडणुकीत प्रवीण माने यांना 37 हजार नऊशे मते मिळाली. कळस -वालचंदनगर जिल्हा परिषद गट वगळता बाकी सर्व जिल्हा परिषद गटात माने यांनी साडेचार हजार पेक्षा अधिकचे मते मिळाली आहेत. या निवडणुकीमुळे माने तालुक्यात प्रत्येक गावात पोहचले असल्याचं चित्र पाहावयास मिळाला.
माने यांनी सत्ताधारी भाजमध्ये प्रवेश केल्यास तालुक्यातील अनेक प्रश्न सोडवण्यास मदत होईल शिवाय तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांना देखील अधिकची ताकद मिळेल. आगामी काळात माने यांनी भाजप प्रवेश केल्यास तालुक्यातील राजकारणाच चित्र बदलू शकत. भाजप प्रवेशबाबत मात्र खुद्द प्रवीण माने यांनी अद्याप कोणताच निर्णय झाला नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. या बाबत पुढील निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.





