पुणे जिल्हा : स्मारकाच्या फरशा काढण्याची परवानगी कोणी दिली? – हर्षवर्धन पाटील

ठेकेदारासह पीडब्ल्यूडीच्या कारभाराविरुद्ध नागरिक संतापले
इंदापूर – तुम्हाला स्मारकाच्या फरशा करण्यासाठी कोणी परवानगी दिली, असा सवाल ठेकेदाराला जागेवर जाऊन, शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत राज्याचे माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केला.
इंदापूर शहरातील पुणे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर शासनाच्या निधीतून मालोजीराजे स्मारक अद्यावत उभारले होते; आता या रस्त्याचे काम सुरू असल्याने कोणाचीही परवानगी न घेता संबंधित ठेकेदाराने येथील फरशा उचकटल्या आहेत. त्यामुळे इंदापूरकर नागरिक संतप्त झाले असून, थेट त्या चौकात येऊन ठेकेदार अधिकारी यांना नागरिकांनी जाब विचारला.
तुमच्याकडे हे स्मारक पाडण्याची ऑर्डर आहे का, ही परवानगी तुम्हाला कोणी दिली असा सवाल संबंधित ठेकेदाराला, अधिकार्यांना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विचारला. तुम्हाला जे रस्ते करायचे आहेत ते करावे; परंतु स्मारकाला हात लावू नका. आम्ही वरिष्ठ पातळीवर बोलून घेतो. जसे स्मारक होते तसे तात्काळ तयार करून द्यावे.
यावेळी इंदापूर नगरपालिकेचे नगरसेवक अमर गाडे यांनी अधिकार्यांची पोलखोल तोंडावरच केली. कालच हा प्रकार आम्ही बांधकाम विभागाचे अभियंता साळुंखे यांना सांगितला होता. ठेकेदाराने काल फरशा काढण्याचे काम चालू केले. आम्हाला लगेच कळाले, मी लगेच सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला.
सूर्यवंशी म्हणाले की, आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाशी परवानगी घेतलेली आहे. त्यामुळे आम्ही पाडणार आहे. आम्ही स्पष्ट सांगितले आम्ही मालोजीराजांचे स्मारक पाडू देणार नाही. फार तर दुसरे स्मारक बांधून द्या तर चला हात लावा. असे सांगितले असताना देखील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे साळुंखे सोमवारी येतो म्हणून आम्हाला सांगितले; मात्र सोमवारपर्यंत काम बंद ठेवा असे आम्ही विनंती केली तरी देखील काम चालू ठेवले आहे.
संबंधित विभागाने या स्मारकाला धक्का लागून न देण्याचा आम्हाला शब्द दिला होता. तरीदेखील हा प्रकार झाला आहे. त्यांनी आमच्या विभागाची परवानगी घेतली नाही.
-साळुंखे, अभियंता बांधकाम विभाग





