Pune District: भाटघरमध्ये व्हायटिंग लेकचे लवकरच दर्शन

भाटघर : सद्यस्थितीला भाटघर धरणात ३० टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने भाटघर धरण बांधण्यापूर्वी आतील बाजूस बांधलेले “व्हायटींग लेक” आता दिसू लागले आहे. ते पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहे. परंतु शासनाच्या आदेशानुसार, भाटघर धरणाच्या उत्तर व दक्षिण बाजूस असणाऱ्या दोन्ही गेटमधून प्रवेश बंदी असल्याने धरण बॅकवॉटरच्या लांब पल्ल्यावरून व्हायटींग लेकचे दर्शन घ्यावे लागत आहे.
ब्रिटिश राजवटीत पिण्याच्या पाण्याच्या उद्देशाने व पूर्वेकडील शेती सिंचनासाठी लेक व्हायटींग धरण बांधण्यात आले होते. या धरणाच्या कामाचा शुभारंभ सन १८८१ मध्ये झाला. उत्तर बाजूस संगमनेर (ता.भोर) गावच्या हद्दीपासून ते दक्षिण बाजूस भाटघर (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत १८ मीटर उंचीची भिंत बांधण्यात आली. या भिंतीचे काम ११ वर्षांनी म्हणजे १८९२ साली पूर्ण झाले. या धरणाला लेक व्हायटींग असे नाव देण्यात आले.
पाणीसाठा कमी पडू लागल्याने भाटघर धरण बांधले
लेक व्हायटींग धरणात ५.२० टीएमसी एवढा पाणीसाठा साठू लागला. परंतु या धरणातील पाणी कमी पडू लागल्याने मोठे धरण बांधण्याच्या उद्देशाने धरणाच्या भिंतीलगत पूर्वेला ५७.९१ मीटर उंचीची भिंत बांधण्यात आली. या धरणाचे काम १९२७ मध्ये पूर्ण झाल्यानंतर या धरणाला “भाटघर धरण” (येसाजी कंक जलाशय) असे नाव देण्यात आले. या भाटघर धरणात २३.७४ एवढा पाणीसाठा साठू लागला. लेक व्हायटींग धरणाचे दर्शन एप्रिलच्या अखेरी किंवा मे महिन्यात होते.
मंदिरांचे दर्शन मे महिन्यात…
भाटघर धरणाची भिंत ही लेक व्हायटींग धरणाच्या भिंतीपेक्षा ३९.९१ मीटर उंच आहे. पावसाळ्यात पाण्याची पातळी लेक व्हायटींग धरणाच्या भिंतीच्या वर गेल्यानंतर लेक व्हायटींग धरण दिसेनासे होते. मात्र दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात भाटघरच्या पाण्याची पातळी ५.२० टीएमसी पेक्षा कमी झाल्यानंतर लेक व्हायटींग धरण दिसू लागते.
धरणात बुडालेल्या मंदिराचे दर्शन मे महिन्यात भाटघर धरण बांधण्याअगोदर पांडव काळात दक्षिण बाजूस वेळवंड गावच्या हद्दीत नागोबा मंदिर तर उत्तर बाजूस कांबरे गावच्या हद्दीत कांबरेश्वर ही दोन मंदिरे बांधण्यात आली होती. ही दोन्हीही मंदिरे पाऊस पडला की धरणाच्या पाण्यात बुडत असतात. साधारण अकरा महिने ही दोन्ही मंदिरे पाण्याखाली असतात. परंतु मे महिन्यात धरणाची पाण्याची पातळी खालावल्यानंतर ही मंदिरे दिसू लागतात. यावेळी ही मंदिरे बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते.





